महत्त्वाचे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, अपमानास्पद विधाने; नाकर्त्या सरकारविरोधात मुंबईत हल्लाबोल मोर्चा : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 11:07 AM2022-12-12T11:07:31+5:302022-12-12T11:07:39+5:30

अनेक गोष्टींबाबत नाकर्त्या सरकारला त्याची जागा दाखवून देण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने दि.१७ डिसेंबर रोजी हल्लाबोल मोर्चा

Important projects outside Maharashtra, defamatory statements; Attack in Mumbai against failed government: Ajit Pawar | महत्त्वाचे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, अपमानास्पद विधाने; नाकर्त्या सरकारविरोधात मुंबईत हल्लाबोल मोर्चा : अजित पवार

महत्त्वाचे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, अपमानास्पद विधाने; नाकर्त्या सरकारविरोधात मुंबईत हल्लाबोल मोर्चा : अजित पवार

Next

इंदापूर : नाकर्त्या राज्य सरकारला जागा दाखवून देण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने येत्या १७ तारखेला मुंबईत जिजामाता उद्यान ते आझाद मैदानापर्यंत हल्लाबोल मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेतकरी मेळाव्यात बोलताना शनिवारी (दि.१०) केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. आ. अमोल मिटकरी, प्रदीप गारटकर यावेळी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, आताच्या नाकर्त्या सरकारमुळे महत्त्वाचे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर चालले आहेत. महापुरुष, महिला पदाधिकाऱ्यांबाबत अपमानास्पद विधाने करणाऱ्या वाचाळवीरांची संख्या वाढत आहे. विकासकामे रोखली जात आहेत. रब्बी खरीप हंगाम वाया गेल्यानंतरदेखील ओला दुष्काळ जाहीर केला जात नाही. विकास होत नसल्याने सीमावर्ती भागातील गावे परराज्यातील विलीन होण्याची भाषा करीत आहेत. साखरेची निर्यात बंद करून कोटा पद्धत लादली जात आहे, अशा अनेक गोष्टींबाबत नाकर्त्या सरकारला त्याची जागा दाखवून देण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने दि.१७ डिसेंबर रोजी हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात विकासकामे थांबवण्याचे पाप आम्ही केले नाही. कुणा एका विशिष्ट पक्षाऐवजी महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून आम्ही कामकाज केले. पालकमंत्री असताना आम्ही निधी देण्यात कधी पक्षीय भेदभाव केला नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या समृद्धी महामार्गाच्या कामाचे पुढच्या अडीच वर्षांचे पैसे आमच्या सरकारने दिले. नितीन गडकरी यांनी सुरू केलेल्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला. यंदा उसाचे टनेज २० टनाने घटले आहे. यंदा साखर कारखाने मार्चलाच बंद होतील. साखरेची निर्यात बंद करून कोटा पद्धत सौरू करण्यात आली आहे. परदेशात साखरेला क्विंटलला चार हजार रुपये दर मिळतो आहे. इकडे ३३०० रुपये आहे. क्विंटलला शेतकऱ्याला सातशे रुपये मिळाले तर यांचे काय जाते असा सवाल पवार यांनी केला.

कोण भिकेला लागतो हे चंद्रकांत पाटलांना दाखवून द्या

महापुरुषांनी भीक मागून शिक्षण संस्था काढल्या असे म्हणतात. आम्ही जर काय भिकारड्यासारखे बोलता असे म्हटले तर काय वाटेल तुम्हाला, असा सवाल उपस्थित करीत, अरे ला का रे आम्हालाही करता येते. ‘भ’ची भाषा तर लई चांगली जमते; पण तशी आमची संस्कृती नाही, वडीलधाऱ्यांचे संस्कार नाहीत, असा टोला मारून यांना आत्ता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. साऱ्या महापुरुषांची आठवण ठेवून, कोण भिकेला लागतो हे चंद्रकांत पाटलांना दाखवून द्या, असे आवाहन पवार यांनी उपस्थितांना केले.

Web Title: Important projects outside Maharashtra, defamatory statements; Attack in Mumbai against failed government: Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.