पुणे : पुणेकरांच्या लाडक्या गणपतीरायाच्या आगमनाची तयारी घरोघरी सुरु झाली आहे. घरच्या गणपतीवर जेवढी पुणेकरांची श्रद्धा तेवढीच मानाच्या सार्वजनिक गणपतींवरही. जगभर प्रसिद्ध असणारा पुण्याचा वैभवशाली गणेशोत्सव आता दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
कोरोना संसर्गाची लाट ओसरली आहे. मात्र अजूनही हे संकट पुरते संपलेले नाही. त्यामुळे काळजी घ्यावीच लागणार आहे. म्हणूनच यंदाच्या गणेशोत्सवात गणेश दर्शनासाठी ऑनलाईन माध्यमांचा वापर जास्तीत जास्त करावा, असे आवाहन मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक झाली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त माधव जगताप यावेळी उपस्थित होते. शासनाला संपूर्ण सहकार्य करून गणेशोत्सव साजरा करताना दोन कमानी व ‘रनिंग’ मांडवाला परवानगी देण्याबाबत बापट यांनी प्रशासनाशी चर्चा केली. श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, श्री गुरूजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रविण परदेशी, श्री तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, विवेक खटावकर, केसरी वाडा गणपतीचे अनिल सपकाळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती न्यासाचे महेश सूर्यवंशी, अखिल मंडई मंडळाचे संजय मते, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, उत्सवप्रमुख पुनीत बालन, नितीन पंडित, पृथ्वीराज परदेशी, विनायक कदम, सौरभ धोकटे आदी बैठकीस उपस्थित होते.
“यंदाही पुण्याच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे पुणेकरांच्या हितासाठी आणि प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करुयात. पुणेकरांनी देखील स्वत:ची आणि इतरांची काळजी घेऊन गर्दी टाळावी. आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन ऑनलाईन घ्यावे,” असे आवाहन सर्वांनी या बैठकीत केले.