लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना लाॅकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे मार्केट यार्डातील सर्वच बाजार घटकांना चांगलीच धडकी भरली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील फळे-भाजीपाला, भुसार आदी सर्व विभागात कडक निर्बंध लावा, पण बाजार बंद ठेवण्याचा कोणताही निर्णय घेण्यात येऊ नये, अशी मागणी बाजार घटकांनी केलीे.
शहरात दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शासनाने रात्री आठ ते सकाळी सात वाजेपर्यंत जमावबंदी लागू केली आहे. मार्केट यार्डात सर्व विभागात दररोज बाजार घटकांसह सुमारे ३० ते ३५ हजार नागरिकांची ये-जा असते. रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी बाजार घटकांची बैठक घेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय उपाययोजना करता येतील याचा आढावा घेतला. यावेळी दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, माजी अध्यक्ष वालचंद संचेती, सचिव विजय मुथा, आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, आप्पा कोरपे, बापू भोसले, हमाल मापाडी महामंडळाचे हनुमंत बहिरट, फुलबाजार संघटनेचे आप्पा गायकवाड, अरूण वीर, तोलणार संघटनेचे राजेंद्र चोरघे, किरकोळ बाजार संघटनेचे मनोज पवार, कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे, संपत धोंडे आदी उपस्थित होते.
गेल्यावर्षी लॉकडाऊन काळात भाजीपाला बाजार बंद असल्याने शेतक-यांसह आडत्यांचे नुकसान झाले. बाजाराबाहेर शेतमाल विक्री सुरू झाल्याने मार्केट यार्डातील बाजारावर त्याचा परिणाम झाला. भुसार बाजार सुरू असला, तरी थकीत उधा-या अद्याप व्यापा-यांना मिळाली नाही. बाजार बंदमुळे सर्व घटकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे बाजार बंद न करता बाजारात विना मास्क फिरणा-यांवर कडक कारवाई करावी. गेटवर सॅनिटायझर ठेवावे. प्रत्येकाची थर्मल गनव्दारे तापमान तपासणी करावी. नियमांची कडक अंमलबजावणीसाठी बाजार समितीच्या कर्मचा-यांचे फिरते पथक ठेवावे, आदी सूचना विविध बाजार घटकांनी केल्या.