पुणे: देशाची फाळणी झाल्यानंतर सामाजिक स्थितीबाबत विद्यार्थ्यांना माहिती द्यावी असे सीबीएसईने शाळांना पाठविलेल्या परिपत्रकात नमूद आहे. मात्र, फाळणीचा रक्तपाताचा इतिहास आणि कटूतेची भावना असलेला इतिहास नव्या पिढीच्या मनावर बिंबवणे हे देशाच्या सामाजिक, सांघिक ऐक्यासाठी याेग्य राहणार नाही असे मत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. राज्यातील शैक्षणिक संस्थेत असे काम करावे असे सीबीएसई सांगत असेल तर समाजात विसंवाद वाढेल असे काम हाेणार नाही याची शिक्षण विभागाने काळजी घेत त्यांना कळवावे असा सल्लाही त्यांनी शिक्षण मंत्र्यांना दिला.
सरहद संस्थेच्या सरहद पब्लिक स्कूल, धनकवडी येथील नूतन इमारत आणि गाेपालकृष्ण गाेखले प्रबाेधिनीचा शुभारंभ शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी गृहमंत्री सुशिल कुमार शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, संजय नहार, शैलेश पगारिया, संतसिंह माेखा आदी मान्यवर उपस्थित हाेते.
पवार म्हणाले, सीबीएसई शाळा आणि अभ्यासक्रमावर नियंत्रण ठेवणाऱ्या बाेर्डाने सर्व शाळांना पाठविलेले एक परिपत्रक माझ्या वाचनात आले. हे परिपत्रक मला चिंताजनक वाटते. त्यामध्ये विद्यार्थ्यांना तुम्ही अनेक गाेष्टी संबंधीचे मार्गदर्शन करता तसे या देशाची फाळणी झाल्यानंतर समाजात जी स्थिती निर्माण झाली तीही माहिती विद्यार्थ्यांना देता येईल याची काळजी घ्या असे नमूद केले आहे. मात्र, फाळणीचा इतिहास देश विभाजनाचा इतिहास आहे. त्यावेळी रक्तपात झाला, हजाराे लाेक विस्थापित झाले. पाकिस्तानातून निघून आलेला सिंधी समाज माेठ्या संख्येने उल्हासनगर येथे राहताे. त्यांनीही त्यावेळी प्रचंड यातना सहन केल्या. पंजाब आणि त्या परिसरातील अनेक मुस्लिम लाेक पाकिस्तानात गेले. पाकिस्तानात काय झालं? या बाबत मी काही बाेलू इच्छित असल्याचे त्यांनी नमूद केले.
नव्या पिढीची वैचारिक जडण घडण महत्वाची
सार्वजनिक जीवनात नव्या पिढीने यावे असा आग्रह आम्ही करताे. मात्र, ही पिढी वैचारिकदृष्ट्या घडलेली असली पाहिजे. देशाचा इतिहास आणि समाजाचे प्रश्न माहिती असले पाहिजेत. समाजातील सर्व घटकांना एकत्रित ठेवण्याची सक्ती त्यांच्यावर निर्माण केली पाहिजे आणि ते काम गाेखले प्रबाेधिनीच्या माध्यमातून हाेईल असे पवार म्हणाले.