लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: शासनाच्या आदेशानुसार आधार क्रमांकाच्या आधारे नोंदणी करूनच कोरोना प्रतिबंधक लस दिली जाते. परंतु शहर आणि जिल्ह्यातील हजारो भिका-यांकडे आधार कार्डच नसल्याने हे लोक लसीकरणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. समाजातील सर्व घटकांचे लसीकरण झाले आणि भिकारी वंचित राहिल्यास हा घटक कोरोनाचा प्रसार वाढविण्यास कारणीभूत ठरू शकतात.
जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मार्चपासून सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचा-यांचे लसीकरण करण्यात आले, दुस-या टप्प्यात अत्यावश्यक सुविधा कर्मचारी म्हणजे महसूल, पोलीस, अंगणवाडी कर्मचारी आणि शिक्षक यांना लसीकरण करण्यात आले. तर तिस-या टप्प्यात ६० वर्षांवरील सर्व नागरिकांना आणि अन्य व्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांनाही लस देण्यात येणार आहे. या लसीकरणाची ऑनलाइन नोंदणी बंधनकारक केली आहे. लसीकरणाच्या नोंदणीसाठी ओळखपत्र म्हणून आधारकार्डचा वापर करण्यात येत आहे. याद्वारे नागरिकांची आरोग्यविषयक माहिती भरून, लसीकरणाची तारीख, वेळ व ठिकाण सांगण्यात येत आहे. सध्या तरी आधार क्रमांक असलेल्या लोकांना लसीकरणाचा लाभ घेता येत आहे.
राज्यात मुंबई नंतर पुणे शहर आणि जिल्ह्यात भिका-यांची संख्या सर्वाधिक आहे. परंतु ही संख्या नक्की किती आहे याची आकडेवारी मात्र प्रशासनाकडे नाही.
------
पुणे शहर आणि जिल्ह्यात भिका-यांची संख्या हजारांच्या घरात आहे. यामध्ये काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन या भिका-यांना स्वत:चा ओळखीचा पुरावा देण्यासाठी आधार नोंदणी केली आहे. पुणे शहरातील 20-30 टक्के भिका-यांकडे आधार कार्ड असू शकते. परंतु आजही 70-80 टक्के भिकारी लोकांकडे आधार कार्ड नाही.
--------
आधार नोंदणीची अट शिथिल करावी
पुणे शहरात भिका-यांची संख्या खूप जास्त असून, ही संख्या सतत कमी जास्त होते. दुष्काळ पडला, पूर आला किंवा लाॅकडाऊनसारखे संकट आले की ही संख्या वाढते. पुणे शहरात आमच्याकडे 1 हजार 100 भिक्षेक-यांची अधिकृत नोंद आहे. परंतु यामध्ये बहुतेकांकडे आधार कार्ड नाही. शासनाला कोरोना खरच हद्दपार करारचे असेल तर शंभर टक्के लोकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. पण आधार कार्ड किंवा अन्य नोंदणीच्या अटी शिथिल केल्या पाहिजेत.
- डाॅ. अभिजित सोनवणे, डाॅक्टर्स फाॅर बेगर्स
------
शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार लसीकरण करणार
सध्या कोरोना लसीकरणासाठी शासनाकडून आधार कार्ड अथवा अन्य कोणत्याही पुरव्यानुसार नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना निश्चित केल्या आहे. सध्या सरसकट लसीकरण सुरू झालेले नाही. त्यामुळे भविष्यात या संदर्भात नव्याने मार्गदर्शक सूचना येतील.
- अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक