पिंपरी : लाडक्या बाप्पाची मनमोहक रूपे भक्तांना आकर्षित करीत आहेत. सध्या लोकप्रिय असलेल्या जय मल्हार मालिकेतील खंडेराय रूपातील बाप्पा, मुंबईचा लालबाग, पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई, कसबा अशा प्रतिष्ठित गणपतींच्या विविध आकारांतील हुबेहूब मूर्तींना पसंती मिळत आहे. विविधरूपी गणेशमूर्ती लक्षवेधी ठरत आहेत. गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणरायाच्या आकर्षक व विलोभनीय आणि प्रसन्न मुद्रेतील मूर्ती पसंत करण्यासाठी नागरिकांसह कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे. शहरातील अनेक ठिकाणी मूर्तीचे एक हजारपेक्षा जास्त स्टॉल सजले आहेत. संध्याकाळी मूर्ती ‘बुक’ करण्यासाठी झुंबड उडत आहे. रुपीनगर, सांगवी, चिखली, देहूगाव, हडपसर, मुंढवा, उरळी कांचन, तसेच पेण येथे मूर्ती मोठ्या प्रमाणात घडविल्या जातात. विविध स्टॉल व दुकानात लाखो मूर्ती आहेत. सहा इंचांपासून साडेसहा फुटांपर्यंत मूर्ती आहेत. पावसामुळे गैरसोय
पाऊस दररोज हजेरी लावत आहे. मंडपात पाणी गळत असल्याने विक्रेत्यांची गैरसोय होत आहे. परिसरात पाणी साचून चिखल होत आहे. पावसामुळे गणेशभक्तांना मूर्ती पाहता येत नाहीत. पाण्यापासून बचावासाठी मूर्ती प्लॅस्टिकमध्ये झाकून ठेवाव्या लागत आहेत. वीज खंडित होते.सर्वाधिक घरगुती गणपतीस्टॉलवर छोट्या मूर्ती सर्वाधिक आहेत. घरोघरी, मंडळात पूजेच्या म्हणून छोट्या मूर्ती असतात. या मूर्तींची संख्या लाखोंच्या वर आहे. घराच्या आकाराप्रमाणे मूर्ती निवडली जाते.(प्रतिनिधी)