पुणे : जम्बो कोविड सेंटरमधील असुविधा दूर करुना वैद्यकीय व्यवस्था तात्काळ सुरळीत करण्याची मागणी मनसेच्या महिलाध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी केली आहे. गुरुवारी त्यांनी मनसे स्टाईल आंदोलन करीत थेट गेटवरुन चढून जम्बो सेंटरमध्ये प्रवेश केला. विभागीय आयुक्तांनाही त्यांनी यावेळी रुग्णांच्या हेळसांड होत असल्याबद्द्ल जाब विचारला.जम्बो सेंटरमधील नियोजनाच्या अभावामुळे तसेच पीएमआरडीए आणि पालिकेमधील समन्वयाच्या अभावामुळे रुग्ण हवालदिल झाले आहेत. पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूमुळे अन्य रुग्ण घाबरले असून येथील वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टरही घाबरले असल्याचे पाटील म्हणाल्या. जम्बो सेंटरची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पाटील यांना गेटवरच बाऊन्सरने अडविले. त्यांच्यासोबत कॉंग्रेसचे ॠषीकेश बालगुडे व अन्य कार्यकर्ते होते. बाऊन्सर आतमध्ये सोडत नसल्याने त्यांनी थेट गेटवर चढून आतमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ सर्व कार्यकर्ते आतमध्ये गेले.त्यावेळी विभागीय आयुक्त राव जम्बोमध्ये बैठक घेत होते. त्यांच्याकडून माहिती घेत पाटील यांनी यंत्रणांमधील असमन्वय दूर करावा, रुग्णांना वेळेवर जेवण मिळावे, त्यांना आनंदी वाटेल असे वातावरण निर्माण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी राव यांनी कार्यकर्त्यांना उपाययोजनांबद्द्ल माहिती दिली. शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनीही पालिका आयुक्तांना पत्र देऊन जम्बो कोविड सेंटरमधील त्रुटी दूर करण्याची मागणी केली आहे. पीएमआरडीए आणि पालिकेमध्ये समन्वय घडविण्यासोबतच रुग्णांना सुविधा उपलब्ध करुन देणे, रुग्णवाहिकेची आणि मनुष्यबळाची व्यवस्था करण्याची मागणी त्यांनी केली आहे.=====स्वतंत्र आपत्कालीन व्यवस्था सुरु कराएका पत्रकाराचा व्यवस्थेतील त्रुटींमुळे प्राण जाणे हे दुर्दैवी असून ही घटना पालिकेसाठी लाजीरवाणी आहे. शहरात सर्व प्रकारच्या रुग्णवाहिका, तज्ञ डॉक्टर व सुसज्ज हॉस्पिटल उपलब्ध असतानाही त्यांच्यामध्ये समन्वय नाही. त्यामुळेच अशा घटना घडत आहेत. कोरोना रुग्णांना वैद्यकीय उपचार वेळेत मिळणे अत्यंत आवश्यक असून पालिकेने स्वतंत्र यंत्रणा (कक्ष) उभारणे गरजेचे आहे. जिथे सामान्य नागरिकांवर उपचारांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध होतील.- दीपाली धुमाळ, विरोधी पक्षनेत्या
'जम्बो कोविड केअर'मधील अवस्था सुधारा; रुग्ण घाबरलेल्या अवस्थेत : पुण्यात मनसे आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 9:09 PM
जम्बो केअर सेंटरचे गेट चढून कार्यकर्ते गेले आत.. विभागीय आयुक्तांना विचारला जाब
ठळक मुद्देपुण्यात मनसे स्टाईल आंदोलन