पुणे: खंडेरायाच्या जेजुरीत गेल्या काही दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. जेजुरीकर नागरिकांना पाण्याच्या भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. तीन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान न करण्याचा इशारा देण्यात आला आहे. समस्थ जेजुरी ग्रामस्थांकडून जेजुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना पत्र लिहून ही मागणी करण्यात आली आहे.
पत्रात नेमकं काय...
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाची जेजुरी नगरीत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या भागांमध्ये नगरपालिकेच्या वतीने पिण्याचे पाणी मिळत नाहीये. जेजुरीकर नागरिकांना पाण्याच्या भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाच्या वतीने पाण्याच्या नियोजनात पाणीपुरवठ्याबाबत विस्कळीतपणा आलेला पाहायला मिळत आहे. जेजुरीकर नागरिकांच्या सुद्धा पाण्याबाबत तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. त्या अनुषंगाने समस्त ग्रामस्थांच्या वतीने आम्ही आपणास या निवेदनामार्फत दोन ते तीन दिवसाच्या आत जेजुरी मध्ये पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू करावा अशी मागणी आपल्याकडे करत आहोत. जर दोन ते तीन दिवसात जेजुरीतला पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही आणि टँकरद्वारे जेजुरीच्या सगळीकडे पाणी पोहोचवलं गेलं नाही तर आम्ही जेजुरीकर ग्रामस्थ येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बहिष्कार टाकणार आहोत.
जेजुरी शहरात पाण्यासोबत विविध अडचणींचा सामना जेजुरीमधील नागरिकांना करावा लागतो. तरी आम्ही ग्रामस्थ पुन्हा एकदा विनंती करतो की काहीही करून दोन ते तीन दिवसात पाण्याचा प्रश्न सोडवावा. अन्यथा जेजुरीकरांच्या रोषाला सर्वांनाच सामोरे जावे लागेल. आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सर्व ग्रामस्थ लोकसभेला मतदान करणार नाही. मतदानावरती बहिष्कार टाकू याची दखल घ्यावी आमची मागणी आपण तहसीलदार तसेच जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवावी हि नम्र विनंती असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.