पुणे: काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांची तब्येत खालावली होती.मात्र आता सातव यांच्या प्रकृतीत सुधारणा होते आहे. ते उपचारांना योग्य प्रतिसाद देत असून त्यांच्या ऑक्सिजन पातळीतही वाढ होत आहे अशी माहिती पुण्यातील जहांगिर रूग्णालयात सातव यांच्यावर उपचार करणारे डॉ. सत्यजितसिंग गील यांंनी ही दिली आहे. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यावेळी उपस्थित होते. उपचारांसाठी म्हणून सातव यांना कुठेही हलवणार नसून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.
कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी दुपारी सातव यांच्या तब्येतीची जहांगिरमध्ये जाऊन विचारपूस केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांंनी माहिती घेतली
काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांना १९ एप्रिलला कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली होती. २२ तारखेला त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ऑक्सिजन पातळी खालावल्याने त्यांना २५ तारखेला जहांगिरमध्ये दाखल करण्यात आले.
सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृती सूूधारणा होत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासन आणि राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली आहे.
सातव कोरोनाबाधित झाल्याने त्यांना २५ एप्रिलला उपचारासाठी जहांगिरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सोनिया गांधी, राहुल गांधी, मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस....
खासदार राजीव सातव यांच्या तब्येतीबाबत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यातील काँग्रेस पक्षाचे नेते नजर ठेवून आहे. त्यांच्याकडून सतत फोनच्या माध्यमातून सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस सुरु आहे.