'2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं...', अजित पवारांचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 10:53 PM2023-08-26T22:53:41+5:302023-08-26T22:54:02+5:30
'राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही. मला काही गोष्टी बोलता येत नाही. '
बारामती- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शनिवारी (दि. 26) बारामतीत 'न भूतो न भविष्यति'असे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी अवघी बारामती 'अजितदादा जिंदाबाद 'च्या जयघोषाने दुमदुमली. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामतीत आले. यावेळी बारामतीच्या जनतेला संबोधित करताना अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठा दावा केला.
2004 साली काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आमदार निवडून आले होते. राष्ट्रादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळाले असते, पण काही राजकीय तडजोडींमुळे ते काँग्रेसकडे गेले. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, '2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळाले असते, पण आता काय करणार? मला काही गोष्टी बोलता येत नाही. तेव्हा सोनिया गांधी यांनी विलासराव देशमुख यांना सांगितलेल की, राष्ट्रवादीचे जास्त आमदार निवडून आले आहेत. त्यांचे आमदार त्यांचा मुख्यमंत्री ठरवतील. मात्र, मुख्यमंत्री होऊ शकला नाही'
देशात करीश्मा असणारे नेतृत्व नरेंद्र मोदींशिवाय कोणी नाही; अजित पवारांची स्तुतीसुमने
ते पुढे म्हणाले की, ' 2019 साली उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला. त्यावेळीही, शिवसेनेचे 65 तर राष्ट्रवादीचे 54 आमदार होते. मात्र, अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा झाली नाही. सध्या मला उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. त्याला न्याय देण्यासाठी रात्रीचा दिवस करू. कारखानदारी अडचणीत आहे. यंदा ऊस कमी आहे. गाळप किती दिवस होईल, याची माहिती नाही. बारामती आणि जिल्ह्याचं भलं करण्याचं करू. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना खेचून आणण्याचा प्रयत्न करू. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस मी आणि सहकाऱ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास करण्याची ग्वाही देतो,' असंही अजित पवारांनी म्हटले.