इंदापूर : यंदाच्या वर्षी इंदापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत २८४ ठिकाणी सार्वजनिक मंडळांनी गणेशाची स्थापना केली आहे. २१ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबविण्यात आली आहे. तर ४ हजार ९१० घरांत गणपती बसविण्यात आला आहे.
सार्वजनिकरीत्या गणेशोत्सव साजरा करणाऱ्या २८४ मंडळांपैकी ८४ मंडळे १० व्या दिवशी गणेश विसर्जन करणार आहेत. ९८ मंडळे नवव्या दिवशी, ५४ मंडळे सातव्या दिवशी, २१ मंडळे पाचव्या दिवशी, १५ मंडळे तिसऱ्या दिवशी, तर १२ मंडळे दीड दिवसांनी गणेश विसर्जन करणार आहेत. ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबविणाऱ्या एकूण २१ गावांपैकी १८ गावांमधील गणपती दहाव्या दिवशी, तर उर्वरित ३ गावांतील गणपती नवव्या दिवशी विसर्जित करण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
दरम्यान, गणेश मंडळे व घरगुती स्वरूपात गणपतीची स्थापना करणाऱ्या कुटुंबांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन इंदापूर नगरपरिषदेने केले आहे.
उत्सवाच्या काळात गणेशाच्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा वापर टाळावा. शाडू किंवा कागदापासून तयार केलेल्या नैसर्गिक रंगांचा वापर केलेल्या मूर्तींचा वापर करावा. सजावटीसाठी प्लास्टिक व थर्माकोलचा वापर टाळण्यात यावा. पूजाविधीनंतर निर्माण झालेले निर्माल्य प्लास्टिकमध्ये बांधून नदीमध्ये टाकू नका. विसर्जन मिरवणुकीच्या वेळी ध्वनिक्षेपक अथवा डॉल्बीसारख्या मोठ्या आवाजातील वाद्यांचा व फटाक्यांचा वापर करू नका. जलप्रदूषण टाळण्यासाठी मूर्ती विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात यावे. तेथे विसर्जित केलेल्या मूर्तीचा पुनर्वापर करता येईल याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.