प्रशांत ननवरे
बारामती : सुमारे चार ते पाच दिवस कोणालाही घराबाहेर पडता येत नव्हते. येथे परिस्थिती चिघळलेली होती, अशा वातावरणात मिळेल तेवढा भात व भाजी खाऊन आम्ही कसेबसे दिवस काढले. आमच्या होस्टेलच्या गेटच्या समोर ग्रेनाइट फुटून मोठी आग लागताना आम्हाला दिसत होती. प्रत्यक्षात नाही पण तेथील गंभीर प्रसंगाचे वायरल झालेले व्हिडिओ पाहून काळजाचा थरकाप होत असे. तब्बल पाच दिवस कर्फ्यू लावण्यात आला होता. इंटरनेट सह इतर सुविधा बंद होत्या, अशा शब्दात बारामतीच्या अश्वगंधा पारडे या विद्यार्थिनीने मणिपुरच्या परीस्थितीचा अंगावर शहारे आणणारा अनुभव ‘लोकमत’शी बोलताना कथन केला.
अधिक माहिती देताना अश्वगंधा या विद्यार्थीनीने सांगितले, मी पुण्यातील गरवारे कॉलेजची माजी विद्याथीर्नी आहे. सध्या नॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी, इंफाळ येथे दोन वर्षांपासून मास्टर्स स्पोर्ट्स सायकललॉजीचे गेल्या दोन वर्षांपासून शिक्षण घेत आहे. माझे शिक्षण पूर्ण होत आले असून केवळ परीक्षा देणे बाकी आहे. परंतु, ३ मे रोजी सायंकाळी चार-पाच वाजता मणिपूर हिंसाचाराने होरपळून निघाले. मणिपूर मध्ये सर्वत्र तणावाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक स्थानिक नागरिकांना निर्माण झालेल्या वातावरणामुळे मणिपूर सोडून आसाम राज्यात आश्रयासाठी जावे लागले. गेल्या गेल्या दोन वर्षात तीन वेळा असे प्रसंग आले होते. त्यावेळी एक दोन दिवसांत वातावरणातील तणाव शांत होत असे. परिस्थिती पूर्ववत होत असे. यंदा चौथ्या वेळी प्रथमच परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसली. आमच्या होस्टेलच्या गेटच्या समोर ग्रेनाइड फुटून मोठी आग लागताना आम्हाला दिसत होती. प्रत्यक्षात नाही पण तेथील गंभीर प्रसंगाचे वायरल झालेले व्हिडिओ पाहून काळजाचा थरकाप होत असे.परंतु लष्कर आणि एनएसजीचे कमांडर आल्यानंतर परिस्थिती काही प्रमाणात निवळली. कॉलेज आम्हाला घरी सोडायला तयार नव्हते. जबाबदार देखील घ्यायला तयार नव्हते. होस्टेलमधून बाहेर पडण्यास परवानगी देखील नव्हती. यामध्ये मणिपुरी विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले. तसेच मेसमध्ये काम करणाºया तेथील स्थानिक कामगारांना घरी पाठविण्यात आले. त्यामुळे आमचे जेवणाचे हाल होऊ लागले. भात आणि भाजी असेल तर देण्यात येत. नाष्ट्यामध्ये ब्रेड आणि उकडलेले अंडे मिळत असे. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जाण्यास सुरूवात झाल्याचे दिसताच मी माझ्या पप्पांना संपर्क साधला. माझ्या प्रमाणेच इतर विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या पालकांना संपर्क साधला. शेवटी महाराष्ट्र शासनाने आम्हाला स्वतंत्र विमानाद्वारे महाराष्ट्रात आणले. त्यासाठी इम्फाळमधून मणीपूर स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसमध्ये आम्हां २५ विद्यार्थ्यांना पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले. तेथुन विमानाने गुवाहाटीला आणण्यात आले.
पप्पांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार यांचे बोलणे झाले असून काळजी करू नका, असा दिलासा दिला. आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी आरोग्य आणि जीवन महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही घरी या अशी महत्त्वाची भूमिका घेतली. महाराष्ट्र शासनाने लक्ष घालून आम्हाला सुरक्षितरीत्या आणले. आम्हाला विमानाने गुहाटी मार्गे मुंबईपर्यंत आणले. मी मंगळवारी (दि ९) पुण्यात सुखरूप पोहोचले.माझे वडील डॉक्टर असून सरकारी सेवेत आहेत. आई गृहिणी आहे. मला परत घरी आलेले पाहून त्यांना खूप आनंद झाला.आम्हाला राज्यात परत आणण्यासाठी प्रयत्न केलेल्या प्रत्येकाचे आभार मानते,असेही अश्वगंधा पारडे हिने सांगितले.
...या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही
माझ्या दोन विषयांची परीक्षा २१ जुन रोजी आहे.तेवढ्या दोन विषयांच्या परीक्षेसाठी जावे लागणार आहे.कॉलेज आॅनलाईन परीक्षा घेण्यास तयार नाहि.परीस्थिती न निवळल्यास परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता आहे.त्यानंतर काय होणार,या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाहि,अशी व्यथा अश्वगंधा पारडे या विद्यार्थीनीने सांगितली.