पुणे : सोललेले हिरवे मटार फक्त पाहिले तरी मन तृप्त होते. तोच उसळ रूपात हिरव्या-पिवळ्या रश्शात ब्रेडच्या स्लाइससोबत पुढे आला तर, त्यापेक्षा आणखी मोठी गोष्ट ती काय? सन १९६४ पासून भवानी पेठेतील वटेश्वर भुवन अनेक पिढ्यांची क्षुधाशांती करीत आहे. त्यांच्या तीन पिढ्या तशाच खाणाऱ्यांच्याही तीन पिढ्या. आजोबा, वडील व नातू असे तिघेही वेगवेगळ्या वेळी तिथे खायला येतात.
तोंडाला पाणी सुटणारी मांडणी
भरपूर कोथंबीर, ओले खोबरे व चवीला लागेल अशी हिरवी मिरची याचा रस्सा, त्यात चांगले मऊसुत झालेले मटार. एका गोलसर डिशमध्ये हे रसायन समोर येते. मध्यभागी लाल तडक्याची टिकली. ब्रेडच्या दोन स्लाइसची डिश या मटार उसळीला शोभा देते. हवी असल्यास कांदा-कोथंबीरही मिळते. स्लाइसचा एक तुकडा मोडायचा, तो रश्शात बुडवायचा व अगदी अलगद हातांनी जिभेवर सोडून द्यायचा. आवडत असेलच तर मग एखादी गोलभजी तोडून त्याच्याबरोबर तोंडातच मिसळायची.
चव मटारची, मसाल्याची नाही
ताजे मटार, ताजा मसाला व तिखटावर मोजकाच भर. उसळ खाताना मटारची चव लागायला हवी, मसाल्याची नाही, हा वटेश्वरचा फॉर्म्यूला. तोच खवय्याच्या पसंतीस पडला आहे. इतका की आता भवानी पेठेतील जुनी घरे सोडून कोथरूड, सिंहगड रस्त्यावर राहायला गेलेले अनेक जण रविवारी किंवा जमेल त्यादिवशी वेळात वेळ काढून खास मटार उसळ-स्लाइस खायला येतात. संपूर्ण कुटुंबही येते. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या वटेश्वरची जागाही चांगली प्रशस्त व हवेशीर आहे.
वसा चवीचा
हल्ली उसळीबरोबर पुऱ्याही सुरू केल्यात. त्याही झकास लागतात; पण खरी मजा स्लाइसचीच. गोल भजी हीदेखील वटेश्वरची खासियत. मात्र, ती खायची उसळीबरोबरच. तोंडी लावल्याप्रमाणे. भजी खाताना उसळ कधी संपते तेही समजत नाही. पूर्वी भवानी पेठेत गुळाची मोठी बाजारपेठ होती. मार्केट यार्डच होते. तेथील कामगारांच्या गरजेतून रामचंद्र कुदळे यांनी वटेश्वर सुरू केले. आता मार्केट यार्ड तिथून गेले. गुळाची पेठही गेली, वटेश्वर मात्र कायम आहे. प्रमोद कुदळे, आता करण कुदळे ही तिसरी पिढी वटेश्वरचा चवीचा वसा जपते आहे.
कुठे खाल - वटेश्वर भुवन, भवानी पेठ, गूळ आळी
कधी - सकाळी ८ ते दुपारी अडीच