पुणे : मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात लवकर पडलेला पाऊस, वेळेवर झालेल्या पेरण्या यामुळे शेतीमधील कामे लवकर उरकल्याने यावर्षी राज्यातील वारकऱ्यांनी समाधानाने संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीला हजेरी लावल्याचे दिसून आले. आषाढी वारीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी कुटुंबातील वारकरी सहभागी होत असतात.
मराठवाडा, खानदेशसह संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी येतात, पण पाऊस वेळेवर पडला की शेतकरी पार्श्वभूमी असलेले शेतकरी शेतीची पेरणी, खुरपणी करून मग वारीत सहभागी होत असतात. यावर्षी जूनच्या सुरुवातीलाच समाधानकारक पाऊस झाल्याने वारकऱ्यांची संख्या तुकोबा आणि माउलींच्या पालखीत वाढली आहे, असे वारकऱ्यांसोबत संवाद साधल्यानंतर त्यांनी सांगितले. त्याचबरोबर गेल्यावर्षी पालखी सोहळा यावर्षीच्या तुलनेत लवकर झाला होता त्याचाही परिणाम दिसून आला.