वाल्हे :नाम तुझे रे नारायणा।
फोडी पाषाणाला पान्हा ।।नाम जपले वाल्मिकाने।
फुटली दोन त्याला पाने ।।आजा मेळा पापराशी। नामे नेला वैकुंठाशी।।
ऐसा नामाचा महिमा । तुका म्हणे झाली सीमा।।
नामाची ताकद ही किती मोठी आहे. हे वाल्या कोळी यांनी दाखविली. ज्या राम नामाने वाल्याचा वाल्मिकी झाला. या महर्षी वाल्मिकीच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या वाल्हे नगरीमध्ये आज श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) दुपारी बारा वाजता पोहोचला. खंडेरायाच्या जेजुरी येथून सकाळी निघालेला पालखी सोहळा सह्याद्रीच्या पर्वतरांगामधून येत असताना, दौंडज खिंडीमध्ये विसवून त्यानंतर दौंडज गावात साडेदहा वाजता पोहोचला.
यावेळी दौंडच गावचे माजी सरपंच जगन्नाथ कदम, सीमाताई भुजबळ, उपसरपंच अनुजा कदम, पोलिस पाटील दिनेश जाधव, विजय फाळके, शरद जाधव, उमेश इंदलकर, माऊली कदम यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी या पालखी सोहळ्याचे स्वागत करून दर्शन घेतले. यानंतर हा पालखी सोहळा वाल्हे गावच्या दिशेने निघाला. दुपारी बारा वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वाल्हे वेशीवर दाखल झाला. यावेळी ज्ञानोबा तुकाराम, महर्षी वाल्मिकी की जयच्या घोषणा देत वाल्हेकर ग्रामस्थांनी पुष्पृष्टी करत पालखी सोहळ्याचे स्वागत केले. हभप अतुल नाझरे यांनी स्वतः बनवलेला सिंहासनाधीश छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ही माऊलींच्या स्वागतासाठी आणला होता, ते विशेष आकर्षण ठरले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ.दिगंबर दुर्गाडे, वाल्हे गावचे सरपंच अतुल गायकवाड, उपसरपंच अमित पवार, माजी सरपंच दत्ता पवार, अमोल खवले, महादेव चव्हाण, माजी सभापती गिरीश पवार, भाजपचे जिल्ह्याचे नेते सचिन लंबाते, वागदरवाडी गावचे सरपंच सुनील पवार, सुकलवाडी गावचे सरपंच संदेश पवार, ग्रामविकास अधिकारी राजाराम शेडगे, तलाठी उमाप भाऊसाहेब, हभप अशोक महाराज पवार, हभप अतुल नाझरे, माजी उपसरपंच पोपट नाना पवार, दिलीप हवलदार, अनिल भुजबळ, प्रा. संतोष नवले, त्रिंबक भुजबळ, गोरख शेठ कदम, अतुल पवार, सचिन देशपांडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागतानंतर पालखी सोहळा पुणेपंढरपूर पालखी मार्गाने सुकलवाडी फाटा येथील पालखी तळाकडे रवाना झाला.
भागवत धर्माच्या भगव्या पताका हातात घेऊन टाळ मृदंगाच्या तालावरती ज्ञानोबा-तुकारामचा जयघोष करीत पालखी सोहळा पालखी तळावरती एक वाजता पोहोचला. त्यानंतर पालखी रथामधून काढून पालखी तळासाठी जागा देणाऱ्या मदने कुटुंबीयांच्या हातामध्ये पालखी दिली गेली. मदने कुटुंबांनी पालखी नाचत-नाचत ओट्याजवळ नेली. चोपदाराच्या इशाऱ्याने पालखी सोहळ्यातील मानाच्या दिंड्या या तंबूच्या बाजूने माऊलींचा जयघोष करत उभ्या होत्या. चोपदाराच्या इशाऱ्याने दिंड्या एकदम शांत झाल्या. चोपदाराने हरवलेल्या जिनसाची यादी वाचली. सकाळी किती वाजता निघायचे आहे. काही सोहळ्यातील अडीअडचणी प्रशासनाला सांगितल्या. त्यानंतर १:३० मिनिटांनी समाज आरती झाली.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उद्या सकाळी साडेसहा वाजता वाल्हे येथून नीरा गावच्या दिशेने जाणार असून, नीरा नदीमध्ये पवित्र स्नान करून हा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे. हा सोहळा संध्याकाळी लोणंद येथे मुक्कामी जाणार आहे.