काटेवाडी : कविवर्य मोरोपंतां ती कर्मभूमी बारामतीत विसावा घेतल्यानंतर श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा रविवारी इंदापूर तालुक्यात दाखल झाला. काटेवाडी (ता. बारामती) येथे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पालखी रथाभोवती वैशिष्ट्यपूर्ण मेढयाचे रिंगण पार पडले. यावेळी हजारो भाविकांनी हा सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. पूर्वी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मार्गस्थ होत असताना परिसरातील मेंढपाळांनी मेंढ्यांची रोगराई दुर होण्यासाठी पालखी रथाभोवती गोल रिंगण घालून मनोभावें वंदन केले त्या वेळेपासून ही आगळीवेगळी परंपरा भाविकांनी श्रध्देने जपली आहे.
रविवार (दि. ७ ) रोजी दुपारी काटेवाडी (ता. बारामती) येथे धोतराच्या पायघड्या अंथरूण जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उत्साही स्वागत करण्यात आले. दुपारी ३ वाजता संभाजी काळे, तात्यासो मासाळ, महादेव काळे, राजेंद्र मासाळ, हरि महारनवर, यांच्या मेंढ्यांनी पालखी रथाभोवती पाच प्रदक्षिणा घालुन रिंगण पुर्ण केले. यावेळी उपस्थित भाविकांनी हरिनामाचा गजर केला. या वैशिष्ट्यपूर्ण रिंगणाने भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. बारामती शहरातून रविवारी पहाटे प्रस्थान ठेवल्यानंतर पिपंळी, लिमटेक येथील स्वागत सत्कार स्वीकारत पवाराच्या काटेवाडीत विसावला. यावेळी पालखी रथातून दर्शन मंडपात पालखी नेण्यासाठी परिट समाज बांधवांच्या वतीने धोतराच्या पायघड्या घालण्यात आल्या.
गावच्या वेशीतून बॅडपथक, शालेय लेझिमपथक, हरिनामाच्या गजरात मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी पालखी खांद्यावरून दर्शन मंडपात नेण्यात आली. या पालखी सोहळ्याचे उपमुख्यमत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे शर्मिला पवार, युगेंद्र पवार ,छत्रपतीचे साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे , पणन महामडळाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले आदींनी स्वागत केले. पालखी सोहळा दर्शन मंडपात विसावल्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. काटेवाडी येथे पालखी च्या स्वागतासाठी पताका, स्वागत कमानी, लावून परिसराची सजावट केली होती. तर दर्शन मंडप सभागृह फुलांच्या माळांनी सजविले होते. पालखी सोहळा दुपारी विसावल्या नंतर वारकरी भाविकांनी गावात जेवणाचा आस्वाद घेतला. तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी च्या घरी वारकरी भाविकांनी जेवणाचा आस्वाद घेतला. सुनेत्रा पवार स्वत. भाविकांना जेवणासाठी आग्रहाने पंगतीत लक्ष ठेवून होत्या. दुपारच्या जेवणाच्या विसाव्या नंतर तीन वाजता वैशिष्ट्यपूर्ण रिंगण सोहळा पार पडला. यावेळी तुकाराम तुकाराम असा गजर करण्यात आला. रिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी दुतर्फा मोठी गर्दी केली होती. तहसीलदार गटविकास अधिकारी अनिल बागल, यानी तालक्याच्या वतीने निरोप दिला काटेवाडीच्या रिंगण सोहळ्या नंतर भवानीनगर येथे पालखी सोहळ्याचा इंदापूर तालुक्यात प्रवेश झाला.