लोणी काळभोर(पुणे ) : पुणे शहरातील मुक्काम उरकून जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी (Sant Tukaram Maharaj palkhi Sohala) पुणे सोलापूर महामार्गाहून पंढरपूरच्या दिशेने निघाली. तुरळक पावसाच्या सरी तर मधेच पडणारे ऊन याचा आनंद घेत जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मंगळवारी (दि.२) संध्याकाळी सातच्या सुमारास लोणी काळभोरच्या कदमवाकवस्तीच्या पालखी स्थळावर विसावला. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने रविवार (दि.३०)आणि सोमवारी (दि. १)असे दोन दिवस पुण्यात मुक्काम केला. (Ashadhi Wari)
पुणेकरांचा पाहुणचार घेऊन पालखी सोहळा मंगळवारी सकाळी सात वाजता लोणीकाळभोरकडे मार्गस्थ झाला. या सोहळ्याने सकाळचा गारवा आणि ढगाळ वातावरणात पहिला विसावा हडपसरमध्ये घेतला. दुपारचा विसावा पालखीने साडे तीनच्या सुमारास मांजरी फार्म येथे घेतला. पावसाच्या सरीसोबत वारकरी 'ज्ञानोबा तुकाराम'च्या जयघोष करीत सायंकाळी साडे पाचच्या सुमारास कदमवाकवस्ती येथील कवडीपाट येथे दाखल झाला. यावेळी कवडीपाट टोलनाक्याजवळ लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच, ग्रामसेवक सदस्यांनी पालखीचे स्वागत केले. लोणी स्टेशन चौकात फटाक्याच्या अतिशबाजीत पालखीचे स्वागत करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी पालखीच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. फराळाची व्यवस्था मंगळवारी एकादशी असल्याने वारकऱ्यांना स्वयंसेवी संस्था, मंडळांकडून फराळाचे वाटप करण्यात येत होते. 'माउली फराळ करून जावा', अशी प्रेमाची हाक पालखी मार्गावरील नागरिक वारकऱ्यांना देत होते. तसेच ठिकठिकाणी वारकऱ्यांना राजगिऱ्याची चिक्की, लाडूचे वाटप करण्यात येत होते.