पुणे : प्रत्येकाला पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार माेफत करण्याची जाहिरात माेठ्या प्रमाणावर केली जात आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत याेजनेचे कार्ड काढून देण्याचा धडाका सुरू आहे. दुसरीकडे या याेजनेतून ससून आणि पुणे कॅन्टाेन्मेंट हाॅस्पिटल वगळता इतर काेणत्याही शासकीय किंवा खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचार हाेत नाहीत. त्यामुळे या कार्डचा उपयाेग सध्यातरी शून्य हाेत असल्याचा अनुभव रुग्ण आणि नातेवाइकांना येत आहे.
महात्मा फुले जन आराेग्य याेजनेतून अनेक शस्त्रक्रिया हाेत नाहीत आणि पाच लाख रुपयांची मर्यादाही अजून लागू झाली नसल्याने दाेन्ही आराेग्य याेजनांचा नुसताच गवगवा केला जात असल्याचा अनुभव रुग्णांना येत आहे.
काय आहे याेजना?
आयुष्मान भारत ही केंद्र शासनाने २०१८ राेजी सुरू केलेली पाच लाख रुपयापर्यंत माेफत उपचार देणारी याेजना आहे. याबाबत केंद्र व राज्य शासनाकडून माेठ्या प्रमाणावर जाहिरात केली जाते. परंतु, माेठ्या खासगी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये ही याेजनाच नाही. ही याेजना प्रामुख्याने शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये येथे आहे.
समस्या काय :
या याेजनेस पात्र असलेल्या रुग्णाला सुरुवातीला थेट या याेजनेतून उपचार केले जात नाही. तर, आधी महात्मा फुले जन आराेग्य याेजनेतून उपचार केले जातात आणि याेजनेचा दीड लाखाचा निधी संपला तर आणि आयुष्मान भारत या याेजनेत घेऊन उपचार केले जातात. परंतु, तुरळक प्रकारच्या पेशंटना याची गरज पडते. म्हणून आयुष्मान भारत ही याेजना पांढरा हत्ती ठरत आहे.
प्रमुख उपचार महात्मा फुले याेजनेतूनच :
वास्तविक पाहता अंगीकृत रुग्णालयांमध्ये आयुष्मान भारत याेजना महाराष्ट्रासह देशात २०१८ मध्ये लागू झाली. मात्र, महाराष्ट्रात दीड लाखापर्यंत माेफत उपचार देणारी महात्मा फुले जन आराेग्य याेजना (राजीव गांधी जन आराेग्य याेजना) २०१४ पासूनच सुरू हाेती. त्याअंतर्गत अपघात, अँजिओप्लास्टी, बायपास, अस्थिराेग, मेंदूविकार यासह साडेसातशे प्रकारचे उपचार हाेत हाेते. म्हणून आयुष्मान भारत याेजना आल्यावर २०१८ पासून या याेजनेची महाराष्ट्रात कशी अंमलबजावणी करायची याचा पेच हाेता. म्हणून महात्मा फुले जन आराेग्य याेजना आणि आयुष्मान भारत याेजना एकत्र केली आहे. परंतु, प्रमुख उपचार महात्मा फुले याेजनेतूनच हाेत आहेत.
परतावा मिळेना म्हणून टाळाटाळ :
महात्मा फुले जनआराेग्य याेजना ही पुण्यातील सरकारी आणि खासगी मिळून ६९ रुग्णालयांत आहे. आयुष्मान भारत ही याेजना ससून रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, कॅंटाेन्मेंट रुग्णालय आणि काही उपजिल्हा रुग्णालयांतच आहे. ज्यांनी या याेजनेतून उपचार घेतले त्या हाॅस्पिटल्सना शासनाकडून परतावाही मिळालेला नाही. त्यामुळे या याेजनेतून उपचार देण्यास सरकारी रुग्णालयेही टाळाटाळ करत आहेत.
कार्ड काढण्याचा मात्र धडाका!
आयुष्मान भारत याेजनेतून उपचार मिळत नसले तरी याचे कार्ड काढण्याचा धडाका केंद्र आणि राज्य शासनाने लावला आहे. आराेग्य विभागासह सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडूनही हे कार्ड काढले जावे, यासाठी प्रचंड फाॅलाेअप सुरू आहे. तसेच महात्मा फुले जनआराेग्य याेजनेच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांनाही याचे प्रेशर आहे. दुसरीकडे या कार्डचा काही उपयाेग हाेत नसल्याने रुग्णांच्या संतापाला सामाेरे जावे लागत आहे.
पॅकेज वाढवणे गरजेचे :
महात्मा फुले जनआराेग्य याेजना २०१४ मध्ये सुरू झाली. त्यावेळी या अंतर्गत खासगी रुग्णालयांना शस्त्रक्रिया किंवा प्रक्रिया करण्यासाठी जे पॅकेज हाेते ते आज ९ वर्षांनंतरही कायम आहे. त्यामुळे ते पॅकेज खासगी रुग्णालयांना परवडत नाही. त्यामुळे खासगी रुग्णालये या याेजनेत येण्यास उत्सुक नसतात. त्यासाठी पॅकेज वाढवणे गरजेचे आहे.