बारामती :बारामती शहरात आज शहर पोलिसांनी रस्त्यावरुन दुचाकी चालविणाऱ्या बेशिस्त विद्यार्थ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. यावेळी पोलिसांनी परवाना नसताना वाहन चालविणे, मोठ्याने आवाज करत दुचाकी चालविणे, नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई केली. तसेच टवाळखोर विद्यार्थ्यांची झाडाझडती घेतली.
पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांकडून वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बुधवारी (दि १७) दुपारी महाविद्यालय परिसरासह प्रमुख ठिकाणी जात बेशिस्त तसेच टवाळखोर विद्यार्थ्यांची झाडाझडती घेतली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ पोलीस उपनिरीक्षक घोडके, मोटे, पाटील यांच्या चार पथकाने बेशिस्त विद्यार्थ्यांवर नजर ठेवत ही कारवाई केली. शहरातील टीसी कॉलेज आणि अनेक शाळा, आर.एन. आगरवाल टेक्निकल हायस्कूल, शाहू हायस्कूल, या ठिकाणी पोलिसांनी सध्या वेशात जाऊन कॉलेज सुटण्याच्या वेळेस मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली.
या कारवाईनंतर शिक्षक, पालक यांनासुद्धा याबाबत पोलिसांनी माहिती दिली. यापुढील काळात पालकांनाही दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा सुनील महाडीक यांनी दिला आहे. या कारवाईमुळे बेशिस्त विद्यार्थ्यांना चाप बसणार आहे.