सांगवी : नीरावागज (ता. बारामती) येथे पालावर राहत असलेल्या व्यक्तीच्या अंगावर वीज पडल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. गंभीर झालेल्या व्यक्तीस ससून शासकीय रुग्णालय पुणे येथे उपचार कामी हलविण्यात आले असल्याची माहिती माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.
साहेबराव नारायण पवार (रा.उरुळी कांचन,पुणे),(वय ६०) असे वीज पडून जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. निरावागज (ता. बारामती) येथे शेतकऱ्यांची अवजारे, विळी असे विविध धातू भात्यावर शेवटण्याचे काम करण्यासाठी गेली दहा ते पंधरा दिवसांपासून कुटुंबाला घेऊन वास्तव्य करत आहेत.
बुधवारी (दि. 27) रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरू असताना साहेबराव पवार यांच्या पालीत पाणी पडत होते. यावेळी पवार हे पाणी पडत असल्याने पाल दुरुस्ती करण्यासाठी बाहेर गेले. यावेळी अचानक विजा चमकू लागल्या असता त्यांच्या अंगावर वीज येऊन पडली. यावेळी पवार यांच्या छातीला व दंडाला भाजले आहे. गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने रुग्णवाहिका बोलावून शासकीय महिला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. यावेळी जखमी पवार हे बेशुद्ध अवस्थेत होते. त्यानंतर आज गुरुवारी पुढील उपचार कामी त्यांना ससून रुग्णालयात हलविण्यात आले.