भीमाशंकर: श्री क्षेत्र भीमाशंकरमध्ये डीजे लावून हुल्लडबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी या तरुणांचा डीजे व गाड्या जप्त करत त्यांच्यावर कारवाई केली आहे.
भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्यावर गाड्यांचे कर्कश्य हॉर्न वाजवून जोरात गाड्या चालवत असतात. तसेच रस्त्याकडेला थांबून गाड्यांमधील साऊंडचा आवाज वाढवून काही तरुण नाचतात. अशा अनेक तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील व घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी घोडेगाव ते भीमाशंकर दरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर कारवाईचे सत्र सुरू केले.
श्री क्षेत्र भीमाशंकरमध्ये पायऱ्यांच्या सुरुवातीलाच डीजे लावून पंधरा ते वीस मुले नाचत होती. त्यांच्या हुल्लडबाजीमुळे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना त्रास होत होता. व भीमाशंकरमधील शांतता भंग होत होती. हे पाहून सुदर्शन पाटील व जीवन माने यांनी सर्व लोकांसमाेर या तरुणांना चांगलाच चोप दिला. मंचर अवसरी येथील हे तरुण होते. पोलिसांनी नुसताच चोप दिला नाही तर त्यांच्याकडील दुचाकी गाड्याही जप्त केल्या. त्यांची नावे लिहून घेतली व त्यांच्यावर पोलीस कारवाईही केली.
''रस्त्याने गाडीतील साऊंडचा आवाज वाढवून नाचणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. याचे काही व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. अशा प्रकारांमुळे धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखले जात नाही. रस्त्याने जाणाऱ्या लोकांना त्रास होतो तसेच शांतता भंग होते व यातून वादावादी होऊन अनुचित प्रकारही घडतात. यासाठीच कोणीही असे कृत्य करू नये, असे करताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी दिला आहे.''