पुणे : फसवणुकीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी ५ लाखांची लाच मागून त्याचा पहिला हप्ता म्हणून ५० हजारांची लाच घेणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस नाईक यांना विशेष न्यायालयाने ३ वर्षे सक्तमजुरी व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस व्ही सहारे यांनी हा निर्णय दिला. सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल शिवाजी शिंगटे आणि पोलीस नाईक दत्तात्रय विठोबा नाईक अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.
दत्तवाडी पोलीस ठाण्यात फुरसुंगी येथील डॉक्टरांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात मदत करुन केस मिटविण्यासाठी सहायक निरीक्षक शिंगटे याने १० लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ५ लाख रुपये देण्याचे ठरले. त्यापैकी ५० हजार रुपये कल्पना हॉटेल येथे स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने २५ एप्रिल २०१४ रोजी सापळा रचून पकडले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक जे. डी. कळसकर, पी. एम. मोरे व अनघा देशपांडे यांनी विशेष न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.
या खटल्यात विशेष सरकारी वकील माधव पौळ, प्रेमकुमार अगरवाल, चंद्रकिरण साळवी यांनी काम पाहिले. पैरवी पोलीस नाई जगदीश कस्तुरे व हवालदार अतुल फरांदे यांनी मदत केली. ॲड. चंद्रकिरण साळवी यांनी ६ साक्षीदार तपासले. सरकारी पंच साक्षीदार यांची साक्ष ही न्यायालयाने कोणत्याही साक्षीदाराच्या पुष्ठार्थाशिवाय ग्राह्य धरावी असा सर्वेाच्च न्यायालयाचा निकाल ॲड. साळवी यांनी युक्तीवादात नमूद केला होता. तो ग्राह्य धरुन न्यायालयाने दोघांनाही ३ वर्षे सक्तमजुरी व १५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.