पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी व गस्त वाढवावी, अशी मागणी महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांना पत्र दिले आहे.
काटे म्हणाले की, चिंचवड मतदारसंघातील वाकड, पिंपळे सौदागर, थेरगाव, पिंपळे निलख, सांगवी विविध परिसरात पोलिस ठाणे हद्दीतील परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दागिने, मोबाइल हिसकावणे, पाकीट मारणे, घरफोडी, चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणत वाढ झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे. परिसरात मोठ्या प्रमाणत उच्चभ्रू सोसायट्या आहेत. त्यातील नागरिक वॉकिंग, खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात. येथे छोटे-मोठे हॉटेल्स व इतर व्यवसाय असून, रात्री त्यातील कामगार, मालक घरी परतत असतात. चोरट्यांकडून धारदार हत्यार किवा बंदुकीच्या धाकाने त्यांच्याकडील मोबाइल, पर्स, दागिने व बाकीचे ऐवज लुटले जातात. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये दहशत व भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. परिसरात नाकाबंदी व पेट्रोलिंग गस्त वाढविण्यात यावी. चोरीच्या घटनेवर नियंत्रण आणावे.