चाकण (पुणे) : जेवणात मीठ जास्त झाल्याच्या कारणावरून हॉटेलचालकाने आचाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून जिवे ठार मारून त्याचा मृतदेह झाडाझुडपांमध्ये फेकून दिल्याप्रकरणी दीड महिन्यानंतर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा, चाकण युनिट तीनच्या पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठत तांत्रिक बाबींच्या आधारे शोध घेऊन मंगळवारी (दि. ८ डिसेंबर) सख्ख्या भावांना बेड्या ठोकल्या आहेत.
प्रसेनजित गोराई ( वय ३५, रा. जिल्हा २४ परगणा, पश्चिम बंगाल) असे हत्या झालेल्या आचाऱ्याचे नाव आहे, तर याच्या हत्येप्रकरणी हॉटेलचालक ओंकार अण्णाराव केंद्रे (२१, सध्या रा. ओंकार ढाबा, चाकण शिक्रापूर रोड, शेलपिंपळगाव, मूळ रा. दिग्रस, ता. कंधार, जिल्हा नांदेड) तसेच त्याचा लहान भाऊ कैलास अण्णाराव केंद्रे (१९, रा. सध्या रा. ओंकार ढाबा, चाकण शिक्रापूर रोड, शेलपिंपळगाव, मूळ रा. दिग्रस, ता. कंधार, जिल्हा नांदेड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
अधिक वृत्त असे की, आरोपींचे चाकण-शिक्रापूर रस्त्यावर शेलपिंपळगाव हद्दीत ओंकार ढाबा नावाने हॉटेल आहे. हॉटेलमध्ये परराज्यातील प्रसेनजित गोराई नावाचा आचारी कामास होता. हॉटेलमधील जेवणात मीठ जास्त झाल्याने हॉटेलचालक ओंकार आणि कैलास या दोन्ही भावांनी मिळून २६ ऑक्टोबर २०२२ ला रात्रीच्या सुमारास प्रसेनजित याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून लाकडी दांडके, लोखंडी रॉड आणि वायरने बेदम मारहाण करून त्याला जिवे ठार मारले होते. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी हॉटेल चालकांनी एक दिवस मृतदेह हॉटेलमधील खोलीत ठेवला.
त्यानंतर दि. २८ ऑक्टोबरला मृतदेह वैष्णवी ढाबा, शेलपिंपळगाव (ता. खेड) हद्दीतील डोंगराळ भागात एका ओढ्यात फेकून त्याची विल्हेवाट लावली होती. दि. ६ नोव्हेंबरला चाकण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने तांत्रिक बाबींच्या आधारे आरोपींचा शोध घेत दीड महिन्याने दोन्ही हॉटेलचालक बंधूंना अटक केली. पुढील तपास चाकण पोलिस करत आहेत.