केडगाव : तालुका दौंड येथील जिल्हा दूध संघाच्या वरवंड दूध शीतकरण केंद्रामध्ये जिल्हा दूध संघासाठी राष्ट्रवादीने उमेदवारी कुणाला द्यायची? यावरून मतदान घेतले आहे. राष्ट्रवादीच्या वतीने विद्यमान संचालक रामदास दिवेकर यांचे सुपुत्र राहुल दिवेकर, माजी संचालक नानासाहेब फडके यांचे चिरंजीव सागर फडके, रेणुकादेवी दूध संस्थेचे संस्थापक चेअरमन पोपटराव ताकवणे तिघेजण इच्छुक आहेत. दौंड तालुक्यामध्ये ७९ मतदान असून त्यापैकी ७४ जणांनी मतदान केले. खुटबावचे नाना थोरात, पारगावचे अतुल ताकवणे, पाटस येथील माउली जाधव हे अनुपस्थित राहिले. वैशाली नागवडे या राहू व खामगाव येथील दोन दुध संस्थांच्या प्रतिनिधी आहेत त्या उपस्थित असूनही त्यांनी मतदान केले नाही.
तालुका राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे उपस्थित होते. त्यानंतर चिठ्ठीद्वारे मतदान घेण्यात आले. मतदान घेण्यावरून नानासाहेब फडके यांचा राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांसोबत वाद झाला. यावेळी निकाल जाहीर करण्यात आले नसला तरी, राहुल दिवेकर यांना सर्वाधिक मते मिळाल्याचा दावा त्यांचे कार्यकर्ते करत होते. विशेष म्हणजे मतदान वरवंड मध्ये होते. वरवंड हे राहुल दिवेकर यांचे गाव असल्याने दिवेकर समर्थक स्थानिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गर्दी केली होती. मतदानानंतर आपल्याला तिकीट मिळणार असा दावा राहुल दिवेकर समर्थक करत होते. तर पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील असे प्रतिपादन उमेदवार सागर फडके यांनी व्यक्त केले.