पुणे : मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे आज पुण्यात दाखल झाले आहेत. पुण्यात आलेल्या पूरग्रस्त भागांत ते नागरिकांशी संवाद साधणार आहेत. सुरुवातील ते पिंपरी चिंचवड मधील सांगवीत दाखल झाले होते. त्या भागात त्यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर ते सिंहगड रोडवरील एकतानगरीत दाखल झाले. त्याठिकाणी एका चिमुकल्याने 'एकनाथ काका आम्हाला प्लिज भिंत बांधून द्या' या आशयाची पाटी मुख्यमंत्री यांना दाखवली आहे.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम राहिला आहे. त्यामुळे पुण्यातील धरणे पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर आहेत. अशा वेळी खबरदारी म्हणून धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या भागात पूर्वपरिस्थिती निर्माण होतीये. प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत केली जात आहे. परंतु या पुरामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सिंहगड रोड भागात मागील आठवड्यात पाणी सोडल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे नुकसान झाले होते. त्या भागातील एकता नगरी येथे नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत.
एकनाथ काका आम्हाला प्लिज भिंत बांधून द्या
खडकवासला धरणातून मोठया प्रमाणात पाणी सोडल्याने एकतानगरीत राहणाऱ्या लोकांचे संसार वाहून गेले होते. एकतानगरीच्या मागच्या बाजूने मुठा नदी वाहते. दरवेळी पाणी सोडल्यावर या भागात पाणी साचते आहे. त्यावर प्रशासन तोडगा काढत नव्हते. आता मागील आठवड्यात आलेल्या पुराने एकतानागरी वासियांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे यावर कायमचा उपाय करायला हवा असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले होते. त्यावेळी त्यांनी नदीकाठी भींत बांधता येईल का? यावर चर्चा करणार असल्याचे सांगितले. तसेच नागरिकांनीही भिंत बांधावी यासाठी उपाययोजना कराव्यात असे मुद्दे प्रशासनासमोर मांडले होते. त्यावरून या चिमुकल्याने धरलेली पती चर्चेचा विषय ठरत आहे. तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्हाला प्लिज भिंत बांधून द्या अशी विनंती करताना दिसतो आहे. त्याची दखल मुख्यमंत्री घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.