पुणे : पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीनंतर मानाचे पाचही गणपती टिळक पुतळ्याजवळ आले असून यंदा मिरवणूक लवकर संपविण्यासाठी सर्वांनीच निर्धार केल्याचे दिसून येत आहे. विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेशभक्त मोठ्यासंख्येने सहभागी झाले असून, ढोलताशांचा आनंद लुटत आहेत.
कसबा गणपतीच्या मिरवणुकीत 'कलावंत' ढोल ताशा पथकाकडून वादन केले जात असून तिथे भाविकांची अलोट गर्दी आहे. ढोल-ताशाच्या गजरात आणि ठिकठिकाणी रांगोळ्याच्या पायघड्या घालण्यात आल्या आहेत. लक्ष्मी रोड परिसरामध्ये पहिले मानाचे गणपती मार्गस्थ करून मग त्या पाठोपाठ इतर गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात होते. आता टिळक पुतळ्याजवळ तिसरा मानाचा गुरूजी तालीम गणपती आला आहे. त्यापाठोपाठ तुळशीबाग आणि केसरीवाडा गणपती आहेत.
पुण्यामध्ये गणेशोत्सवासोबतच गणपती विसर्जन मिरवणुकीला विशेष महत्व आहे. ही मिरवणुक पाहण्यासाठी देशभरातून गणेशभक्त आले आहेत. लक्ष्मी रस्ता गणेशभक्तांनी फुलून गेला आहे. फोटो, व्हिडिओ काढण्यासाठी प्रत्येकाची चढाओढ लागली आहे.