पुणे : हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये विविध मतदान केंद्रांवर सकाळपासूनच नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. येथे दुपारी काही वेळ मतदानाचा वेग मंदावला होता; परंतु सायंकाळनंतर पुन्हा गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. महात्मा फुले वसाहत, वैदवाडी, रामटेकडी या झोपडपट्टी भागांमध्ये मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी चारनंतर पुन्हा गर्दी झाली.
हडपसर विधानसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यत ४.४५ टक्के , ११ वाजेपर्यत ११.४६ टक्के , दुपारी १ वाजता २४.२५ टक्के मतदान झाले. दुपारी ३ वाजेपर्यंत ३८.८३ टक्के मतदान झाले. हडपसर विधानसभा क्षेत्रात सकाळपासूनच विविध मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी एकनंतर या रांगा ओसरण्यास सुरूवात झाली. काही मतदान केंद्र अक्षरश: ओस पडली होती. ऊन ओसरल्यानंतर पुन्हा मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. झोपडपट्टी भाग असलेल्या महात्मा फुले वसाहत, वैदवाडी, रामटेकडी परिसरामधील काही मतदान केंद्रांवर दुपारीही गर्दी होती. सोसायट्यांमधील मतदारांपेक्षा झोपडपट्टीमधील मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह अधिक होता. अनेक मतदान केंद्रांवर पाळणाघर आणि लहान मुलांसाठी सोय केली होती. मात्र, काही मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने मतदारांची गैरसाेय झाली .मतदानाची मुदत सायंकाळी सहा वाजता संपली तरी रांगा लागलेल्या असल्याने अनेक ठिकाणी सहानंतरही मतदान सुरू होते.
उमेदवारांनी केले मतदान
महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांनी मगरपटटा येथील शाळा क्रमांक ७७ मध्ये मतदान केले. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी वानवडीत मतदान केले. मनसेचे उमेदवार साईनाथ बाबर आणि अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांनी कोंढव्यात मतदान केले.
कार्यकर्ता मदतीला तत्पर
कसबा विधानसभा मतदारसंघात मतदान यादीतील नावे शोधण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते नागरिकांना मदत करीत होते. अनेक ठिकाणी मोबाइलवर नावे शोधून देण्यात येत होती. त्यासाठी छोटे प्रिंटर लावून नागरिकांना नावाची प्रिंट देण्यात येत होती. ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी कार्यकर्ते मदत करत होते.