इंदापूर : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांवर उपचार करण्यास टाळाटाळ केल्याचा दावा करत, डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी भिमाई आश्रमशाळेतील ३५० विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सकाळी येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर ठिय्या मांडून बोंबाबोंब आंदोलन केले.
संबंधित डॉक्टरांवर तीन महिने बिनपगारी सेवा देण्याची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी दि.१ सप्टेंबर रोजी तेथेच धरणे आंदोलन करण्याचा इशारा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीया वेळी बोलताना दिला आहे.
दि.११ जुलै रोजी चार वाजता, खराब वातावरणामुळे प्रकृती बिघडल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित भिमाई आश्रमशाळेच्या २७ विद्यार्थी विद्यार्थिनींना उपजिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. त्यादिवशी डॉ. सोमनाथ खाडे यांच्यावर बाह्यरुग्ण तपासण्याची जबाबदारी होती. मात्र ते तेथे नव्हते. फोन करुनही पाच मिनिटात येतो असे सांगून साडेपाच वाजेपर्यंत ते आले नाहीत.
दुस-या डॉक्टरांकडून उपचार करुन घ्यावे लागले. त्यामुळे गोरगरीब मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर उपचार करण्यास टाळाटाळ करुन कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरुन डॉ. खाडे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे ॲड. समीर मखरे यांनी निवेदनाद्वारे वरिष्ठांकडे केली होती. कारवाई न झाल्यास स्वातंत्र्यदिना दिवशी विद्यार्थी रुग्णालयासमोर आंदोलन करतील असा इशारा त्यांनी दिला होता.
आंदोलकांशी बोलताना रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष खामकर यांनी संबंधित डॉक्टरांवर एक दिवस बिनपगारी सेवा देण्याची कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट केले. तथापि त्या डॉक्टरांवर तीन महिने बिनपगारी सेवा देण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली. ती लावून धरण्यात आली. दि.१ सप्टेंबरपासून या मागणीसाठी रुग्णालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा संस्थेचे सचिव ॲड.समीर मखरे यांनी दिला आहे.