इंदापूर : दुपारनंतर मतदानाचा वेग वाढलेल्या इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ७६.१० टक्के मतदान झाले आहे. ३ लाख ४१ हजार ४८५ मतदारांपैकी २ लाख ५९ हजार ८७१ मतदारांनी मतदान केले आहे. २०१९च्या निवडणुकीच्या तुलनेत ०.२४ टक्क्यांनी ‘टक्का’ घसरला असला तरी निवडून येणारा उमेदवार दोन ते तीन हजारांच्या मताधिक्यानेच निवडून येईल, असा प्राथमिक अंदाज आहे.
बुधवारी सकाळी ७ वाजता इंदापूर तालुक्यातील ३३७ मतदान केंद्रांवर मतदान सुरू झाले. सकाळी ७ ते ९ या वेळात ५.०५ टक्के मतदान झाले. ११ वाजेपर्यंत ते १६.०२ टक्के झाले. १ वाजेपर्यंत २९.५० टक्के मतदान झाल्याची नोंद झाली. ३ वाजेपर्यंत हा आकडा ४९.५० टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर मतदानाचा वेग वाढत गेला. सकाळी ७ ते सायंकाळी ५ या कालावधीत ६४.५० टक्के मतदान झाले. ९ वाजता तालुक्यातील मतदान पूर्ण झाले. त्यावेळी ते ७६.१० टक्क्यांवर जाऊन पोहोचले होते.
आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार अमोल मिटकरी यांनी, तर हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांनी सभा घेतल्या. अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांनी प्रचाराच्या सुरुवातीपासून मतदार हाच आपला स्टार प्रचारक समजून मोठ्या सभा टाळत, घोंगडी बैठका, कोपरा सभा घेण्यावर लक्ष केंद्रित केले. आवश्यक तेथे मोठ्या जाहीर सभा घेतल्या.
प्रचारसभांमध्ये आ. दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील यांनी एकमेकांच्या कार्यशैलीतील दोष दाखवत टीकात्मक भाषणे केली. विशेषकरून आ. दत्तात्रय भरणे यांचा संयम ठरावीक काळानंतर सुटतो हे माहिती असणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांनी त्यांना डिवचून पुढे जायचे धोरण राबवले. त्यासाठी कामांचा निकृष्ट दर्जा व मलिदा गँग या आयुधांचा त्यांनी पुरेपूर वापर केला. त्यामुळे आ. भरणे यांना स्पष्टीकरण देण्यातच बराचसा वेळ द्यावा लागला. या दोघांपेक्षा प्रचाराचे वेगळे धोरण प्रवीण माने यांनी आरंभले. या दोघांपैकी कोणावरही कसलीच टीका न करता, तालुक्यातील विकासाच्या अनुशेषाची माहिती देत, संधी मिळाल्यास येत्या पाच वर्षात आपण काय करणार हे माने मांडत गेले.
शेवटच्या तीन दिवसात हर्षवर्धन पाटलांची मुसंडी
प्रचाराच्या पहिल्या तीन दिवसांपासून अपक्ष उमेदवार प्रवीण माने हे आघाडीवर होते, तर आ. भरणे दुसऱ्या क्रमांकावर होते. आप्पासाहेब जगदाळे, हर्षवर्धन पाटील यांचे काही सहकारी आमदार भरणे यांच्या गोटात सामील झाले. पाटील यांचे चुलतभाऊ मयूर पाटील, प्रवीण माने यांच्याकडे आले. त्यामुळे हर्षवर्धन पाटील तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. मात्र शेवटच्या तीन दिवसात जातीय समीकरणांवर हर्षवर्धन पाटील यांनी मुसंडी मारली. आपले आव्हान कायम ठेवले. सर्व घडामोडी पाहिल्यानंतर अधिकची तीन हजार मते मिळवणारा उमेदवार विजयी होऊ शकतो, असा अंदाज आहे. मात्र ती अधिकची मते कोण मिळवणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.