- नम्रता फडणीस
पुणे : ब्रेस्ट कॅन्सरचे वाढते प्रमाण ही आता चिंताजनक बाब बनली आहे. ब्रेस्ट कॅन्सर इंडियाने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, भारतात दर चार मिनिटाला एका महिलेला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान होते. तर दर आठ मिनिटांना एका महिलेचा ब्रेस्ट कॅन्सरमुळे मृत्यू होतो. ही आकडेवारी धक्कादायक आहे. परंतु, ब्रेस्ट कॅन्सरचे वेळीच निदान झाले तर ब्रेस्ट कॅन्सर बरा होऊ शकतो. मात्र, बहुतांश महिला लक्षणे दिसत असूनही, त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, तसे करू नका! घरच्या घरी ब्रेस्टची हाताने चाचपणी करण्याबरोबरच मेमोग्राफीसारख्या चाचण्याही करून घ्याव्यात, असा सल्ला स्त्रीरोगतज्ज्ञांनी महिलांना दिला आहे.
जगभरात ऑक्टोबर महिना हा ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती सप्ताह म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. मात्र, ज्यावेळी कॅन्सरचे निदान होते तेव्हा तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेजला पोहोचलेला असतो. यासाठी कॅन्सरचे वेळीच निदान झाले तर तो उपचारांनी बरा होतो. बदलती जीवनशैली, वाढते वय, वाढलेले वजन, बाळाला ब्रेस्ट फिडिंग न करणे, दारूचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन, आनुवांशिकता, रेडिएशन, पोस्टमेनोपॉजल सर्जरी, तंबाखूचे व्यसन अशा विविध कारणांमुळे ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो, याकडेही स्त्रीरोगतज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे
ब्रेस्टमध्ये वारंवार दुखणे, तेथील त्वचा लाल होणे, किंवा रंग बदलणे. ब्रेस्टच्या आजूबाजूला सूज येणे, निप्पल डिस्चार्ज, निप्पलमधून रक्त येणे, ब्रेस्टची किंवा निप्पलची त्वचा सोलवटणे, ब्रेस्टच्या आकारात बदल होणे, निप्पल आतल्या बाजूला जाणे. काखेच्या खाली गाठ किंवा सूज येणे, अशा लक्षणांचा यात समावेश होतो.
काय कराल आणि काय टाळाल ?
बाळाला स्तनपान अवश्य करावे.
वजन नियंत्रित ठेवावे.
मद्यपान व तंबाखूचे सेवन न करणे.
रेडिएशनपासून दूर राहणे.
बहुतांश महिलांना मासिक पाळीच्या आधी ब्रेस्टमध्ये दुखते. काहीवेळेला वजन वाढते. त्यासाठी पाळी संपल्यानंतर घरच्या घरी ब्रेस्टची चाचपणी करून घ्यावी. त्यावेळी हार्मोन्सची पातळी स्थिर असते. ब्रेस्टचा आकार तोच आहे की बदलला आहे? त्याचे निरीक्षण सातत्याने करावे. त्वचेवर लाली येणे. त्वचा आत ओढली गेली आहे का? ब्रेस्टच्या निप्पलमधून डिस्चार्ज येत आहे का ते पाहावे. याबद्दल फॅमिली डॉक्टरकडून मार्गदर्शन घ्यावे. ब्रेस्टची चाचपणी करण्याची सवयच लावून घ्यावी. चाळिशीनंतर मॅमोग्राफीसह कोलेस्ट्रॉल, मधुमेह आणि उच्च रक्तदाब याच्याही टेस्ट करून घ्याव्यात.
- डॉ. वैजयंती पटवर्धन, प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ