जेजुरी: ओमशिव नारायण वानखेडे या विवाहित तरुणाचे एका महिलेबरोबर प्रेम संबध होते. या महिलेच्या पैशासाठीच्या सततच्या जाचाच्या त्रासाला कंटाळून ओमशिव वानखेडे वय ३० यांनी जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील पारगाव येथे एका शेतात लिंबाच्या झाडाला गळफासाच्या सहाय्याने आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणाबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ओमशिव वानखेडे वय ३० रा. बेटसागवी, ता. लोहा, जि. नांदेड (सध्या राहण्यास चऱ्होली, आळंदी) येथे आई-वडील व पत्नी बरोबर राहत होते. ओमशिव ओला कार चालवून उदरनिर्वाह करत होता. ओमशिव याचे दुर्गा सागर राठोड या विवाहित महिलेशी अनेक दिवसांपासून प्रेमसंबध होते.
या प्रेमसंबधाची माहिती दोन्ही कुटुंबियांना होती. सदर दुर्गा राठोड सतत ओमशिव याच्याकडे पैशाची मागणी करीत असल्याने दोघांच्यात सतत भांडणे होत होती. दि. १ रोजी ओमशिव यांची पत्नी मनीषा वानखेडे यांना ओमशिव यांच्या मोबाईलवरून दुर्गा राठोड यांच्या आई व बहिणीने फोन करून तुझ्या नवऱ्याने दुर्गा हिला विष पाजून तो पळून गेला आहे. दुर्गाला काही झाले तर त्याला सोडणार नाही असे सांगितले.
दुसऱ्या दिवशी दि. २ रोजी मनीषा वानखेडे यांना त्यांच्या नातेवाईकांनी ओमशिव वानखेडे याने जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील पारगाव येथे गळफास घेवून आत्महत्या केल्याची माहिती दिली. मनीषा वानखेडे यांनी याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये दुर्गा राठोड हिच्या पैशासाठीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असून दुर्गा राठोडच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक गावडे करीत आहेत.