पुणे :पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे खडकवासला धरण प्रकल्पातील चार धरणांत गेल्या तीन दिवसांत तब्बल ३ टीएमसी पाणीसाठा वाढला असून, रविवारी सायंकाळपर्यंत दीड दिवसात २ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. चार धरणातील पाणीसाठा ८.१९ टीएमसी झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा पाणीसाठा ८.६६ टीएमसी होता.
पावसाअभावी खडकवासला धरण प्रकल्पाने तळ गाठल्याने गेल्या आठवड्यापासून पुणे शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता.
रविवारी सकाळी गेल्या २४ तासांत खडकवासला धरणात ३२ मिमी, पानशेत १२६ मिमी, वरसगाव १२६ मिमी आणि टेमघर येथे १६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. चार धरणांत मिळून एकूण २६.५६ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी तो २९.७१ टक्के होता.
रविवारी सायंकाळपर्यंत चार धरणातील पाणीसाठा ८.१९ टीएमसीपर्यंत पोहोचला आहे. तो २८.११ टक्के आहे. पुणे जिल्ह्यात सर्वत्र सध्या चांगला पाऊस होत आहे. गेल्या २४ तासांत पिंपळगाव जोगे धरण परिसरात सर्वाधिक १६७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर टेमघर १६५, कळमोडी १३७, पानशेत, वरसगाव प्रत्येकी १२६, मुळशी १०९, माणिकडोह ८८, येडगाव ८३, वडज ३२, डिंभे ४८, घोड १५, चिल्हेवाडी ८४, विसापूर ५, चासकमान ७३, भामा आसखेड ४५, वडिवळे ११०, पवना १०५, आंद्रा ८५, कासारसाई ३८, गुंजवणी ११५, निरा देवधर १०५, भाटघर ६१, वीर ७, नाझरे ६, उजनी ३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पुणे जिल्ह्यात रविवारी सकाळपर्यंतच्या गेल्या २४ तासांत ताम्हिणी १९४, लवासा येथे १६७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. लोणावळा १४४, वळवण १२८, वडगाव मावळ ९४, जुन्नर ७१, भोर १०७, वेल्हे ९६, पौंड ८०, गिरीवन ८८, तलेगाव ५४, लवळे ३५, राजगुरूनगर ३२, वडगावशेरी २६, पाषाण २५, लोहगाव ३४, आंबेगाव १९, हडपसर १८, शिवाजीनगर २०, मगरपट्टा १७, कोरेगाव पार्क १६, दौंड १६, ढमढेरे १५, इंदापूर १४, बारामती ११, पुरंदर ९ मिमी पावसाची नोंद झाली होती.
पुढील ३ दिवस शहरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
पुणे शहरात रविवारी दिवसभर आकाश ढगाळ होते. अधूनमधून पावसाची एखादी हलकी सर येऊन जात होती. मात्र, त्यात जोर दिसून आला नाही. दिवसभरात एक मिमी पावसाची नोंद झाली होती.
पुढील तीन दिवस पावसाचे
पुढील ३ दिवस शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट क्षेत्रात जोरदार पावसाची शक्यता असून, तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.