पुणे : कोथरूड विधानसभा मतदार संघातून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आता दुसरीकडे कोथरूडमधून मनसे देखील उमेदवार देण्याची शक्यता आहे. तसेच कोथरूड विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटही इच्छुक आहे. कोथरूडमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती विरुद्ध मनसे अशी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आहे.
२०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. २०१४ ला आमदार मेधा कुलकर्णी विजयी झाल्या होत्या. त्यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांचा पराभव केला होता. तर २०१९ च्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील विजयी झाले होते. त्यांनी मनसेच्या किशोर नाना शिंदेंचा पराभव केला होता. मनसे आणि शिवसेनेला कोथरूड मतदार संघात मताधिक्य असल्याचे या २ विधानसभांवरुन दिसून आले आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मेधा कुलकर्णी निवडून आल्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मेधा कुलकर्णी यांना तिकीट नाकारलं होतं. त्यांच्याऐवजी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून उमेदवारी दिली. त्यामुळे मेधा कुलकर्णी या नाराज झाल्याचंही बोललं जात होतं. मात्र, पुढे मेधा कुलकर्णी यांना राज्यसभा देऊन देऊन नाराजी दूर करण्यात आली होती.
आता माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनीसुद्धा भाजपकडून विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र भाजपनं त्यांना नाकारून अखेर पाटलांना निवडणूक लढवण्याची संधी दिली. पक्षाने जर मला उमेदवारी नाही दिली, तर मग मला माझ्या जनतेसाठी वेगळा निर्णय घ्यावा लागेल, बालवडकर यांनी सांगितले होते. त्यामुळे आता बालवडकर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
चंद्रशेखर बावनकुळेंना केली होती विनंती
चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल अमोल बालवडकर त्यांची भेट घेतली होती. तेव्हा बालवडकर यांनी विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले होते. भेटीनंतर बालवडकर यांनी माझं नाव उमेदवारी यादीत नक्की येणार असल्याची आशा व्यक्त केली होती. पण आज यादी जाहीर झाल्यावर त्यांचे नाव यादीत नसल्याने ते नाराज झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. आता बालवडकर जनतेसाठी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.