पुणे : अमली पदार्थ तस्करीतील मुख्य सूत्रधार ललित पाटील प्रकरणात दोषी आढळलेले ससून रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना वाचवण्याचा, त्यांना संरक्षण देण्याचा पूर्ण प्रयत्न राज्य सरकार करीत आहे. त्यामुळेच त्यांना अद्याप अटक झाली नाही. सरकारचे हे कृत्य चुकीचे आहे. कुठल्याही दबावाला बळी न पडता पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. अन्यथा, मला रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल, असा इशारा काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिला.
या प्रकरणात ससूनमधील डॉक्टर, स्टाफ, पोलिस यांना पैसे पुरविणारा ससूनमधीलच कर्मचारी महेंद्र शेवते याला ताब्यात घ्या, अशीही मागणी धंगेकर यांनी केली. अमली पदार्थ तस्करीतील मुख्य सूत्रधार ललित पाटील प्रकरणात मुख्य दोषींवर अद्याप कारवाई झाली नाही. या पार्श्वभूमीवर, आमदार धंगेकर यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
धंगेकर म्हणाले, डॉ. संजीव ठाकूर यांना केवळ पदमुक्त करण्यात आले. या प्रकरणात गुंतलेल्या बड्या पोलिस अधिकाऱ्यांनाही अद्याप हात लावला नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेली कारवाई वरवरची आणि दिखाऊ आहे. सखोल चौकशी केली तरच खरे दोषी समोर येतील.
उपचाराच्या नावाखाली तब्बल ९ महिने ललित पाटील हा ससून रुग्णालयात होता. या काळात ललित पाटील याने कोणाकोणाला पैसे दिले, कोणाला सोने दिले, याची रिकव्हरी झाली पाहिजे. पण, हे होताना दिसत नाही. असे झाले असते तर सर्व चित्र स्पष्ट झाले असते. ससूनचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांच्या जवळ ललित पाटील याच्याकडून येणाऱ्या काळ्या पैशाचे वाटप ससूनमधील कर्मचारी महेंद्र शेवते हा करायचा. ससूनमधील डॉक्टर, स्टाफ आणि पोलिस अधिकारी यांना तो पैसा पुरवायचा. पोलिसांना याबाबतची कल्पना असून सुद्धा जाणीवपूर्वक या तपासाची दिशा बदलली गेली, असेही धंगेकर म्हणाले.
पैशाची देवाण-घेवाण करणारा ससूनमधील कर्मचारी महेंद्र शेवते याला तत्काळ ताब्यात घेऊन योग्य ती चौकशी करावी. जेणेकरून या प्रकरणात गुंतलेले अनेक चेहरे समोर येतील. या प्रकरणात वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि ससूनचे डॉक्टर, कर्मचारी सहभागी आहेत. आपले सगळे पितळ उघडे पडेल, असे वाटल्यानेच ललित पाटील याला ठाकूर यांनीच पळवून लावले असावे, अशी शक्यता असल्याने सखाेल चाैकशी करणे गरजेचे आहे.
- रवींद्र धंगेकर, आमदार