लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पती आणि सासरच्या अन्य लोकांविरुद्ध क्रुरतेचे आरोप निश्चित करण्याचा एका स्थानिक दंडाधिकारी न्यायालयाचा आदेश दिल्लीच्या सत्र न्यायालयाने कायम ठेवला आहे. न्यायालयाने म्हटले की, सासरच्या लोकांविरुद्ध क्रुरतेची तक्रार देण्यासाठी विवाहितेने किती दिवस सासरी राहणे आवश्यक आहे, याची कोणतीही तरतूद कायद्यात नाही. सासरी काही तासांच्या वास्तव्यातही असा गुन्हा घडू शकतो.
पीडित विवाहितेच्या पतीने दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध दाखल केलेल्या पुनरावलोकन याचिकेवर अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनील गुप्ता यांनी हा निर्णय दिला. विवाहितेच्या तक्रारीवरून दंडाधिकारी न्यायालयाने पती व सासरच्या अन्य लोकांच्या विरोधात भादंवि ४९८ अ आणि ३७९ या कलमान्वये आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला होता.
कोर्टाने म्हटले की...वकिलांनी म्हटले की, विवाहिता केवळ ११ दिवस सासरी राहिली. इतक्या कमी कालावधीत छळ करणे शक्य नाही. त्यामुळे दंडाधिकारी न्यायालयाचा निर्णय रद्द करण्यात यावा. त्यावर सत्र न्यायालयाने म्हटले की, अशा प्रकारचा छळ अवघ्या काही तासांतही केला जाऊ शकतो. छळ होण्यासाठी महिला किती दिवस सासरी असायला हवी, अशी कोणतीही तरतूद कायद्यात नाही. रेकॉर्डवरील साहित्याची बारकाईने छाननी करणे तसेच दोष सिद्धतेसाठी ते पुरेसे आहे की नाही, हे पाहणे अपेक्षित नाही.
आरोप काय? पती, सासू, सासरा आणि दीर यांनी हुंड्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ केला होता, तसेच तिचे दागिने हिसकावून घेतले होते.