मंचर (पुणे) : शहरातील उत्तम भाग्य ज्वेलर्सवर दरोडा टाकून सात दरोडेखोरांनी साडेसहा लाख रुपयांचा ऐवज चोरला. परत जाताना त्यांनी दुकान मालकाची आई, मुलगा, मुलीला बांधून ठेवून दमदाटी केली. पोलिसांनी व स्थानिकांनी तत्परता दाखवत घटनास्थळी येऊन पाच दरोडेखोरांना जेरबंद केले असून दोघे फरार झाले आहेत. ही थरारक घटना आज पहाटे तीनच्या सुमारास घडली आहे. जैना समदडिया या धाडसी मुलीने हत्यारबंद दरोडेखोरांशी दोन हात केले आहे.
मंचर शहराच्या बाजारपेठेत भरवस्तीत उत्तम भाग्य ज्वेलर्स हे सोन्या-चांदीचे दुकान आहे. मागील एक महिन्यापासून या दुकानाची रेकी दरोडेखोरांनी केली होती. त्यांना स्थानिक दोघांनी मदत करत इत्यंभूत माहिती पुरवली. रात्री मालक अभिजीत समदडिया दुसऱ्या मजल्यावर तर त्यांची आई ललिताबाई (वय 75), मुलगा यश (वय 21),मुलगी जैना (वय 16) हे पहिल्या मजल्यावर झोपले होते. आज पहाटे सव्वा दोन वाजता सात दरोडेखोर ड्रेनेजच्या पाईपवरून तीन मजली इमारतीवर चढले. वरील दरवाजा तोडून जिन्याने ते खाली असलेल्या सोने-चांदीच्या दुकानात आले. दुकानाचे सायरन बंद करून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे तोंड फिरवण्यात आले.
दुकानातील 18 किलो 710 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने तसेच दोन लाख बावीस हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरट्यांनी लुटला. ऐवज घेऊन परत जाताना एका दरोडेखोराचा धक्का पहिल्या मजल्यावरील दरवाजाला लागला. आत झोपलेला यश याला वडील आले असावेत असे समजून त्याने दरवाजा उघडला. त्यावेळी हातात कोयता, कटावणी घेऊन दरोडेखोरांनी त्याच्यावर हल्ला चढविला. यश पळत आजीच्या खोलीत गेला. त्यावेळी झोपलेल्या जैनाकडे दरोडेखराने मोर्चा वळविला. जैनाने धाडस दाखवत एका दरडोखराला लाथ मारली. त्यावेळी दुसऱ्याने तिचे तोंड दाबले असता तिने त्याच्या हाताचा चावा घेतला. ललिता समदडिया यांना दमदाटी करत तुमच्या घरात रोख रक्कम आहे. आम्ही महिन्यापासून वॉच ठेवला आहे. लॉकरची चावी द्या अशी मागणी केली.
मात्र ललिताबाई यांनी चावी नसण्याचे सांगितले. दरोडेखोरांनी तिघांना आतील रूममध्ये बांधून ठेवले. तसेच तेथील सोन्याचे दागिने ताब्यात घेतले. या दरम्यान दुसऱ्या मजल्यावर झोपलेल्या अभिजीत समदडिया यांना झटापटीचा आवाज आला. त्यांनी मोबाईलमधील सीसीटीव्ही कॅमेरे चालू केले. त्यावेळी दोनजण घरामध्ये उचकापाचक करत असल्याचे दिसले. दुकानावर दरोडा पडल्याचे लक्षात येताच अभिजीत समदडिया यांनी गिरीशशेठ समदडिया, नीरज समदडिया, महावीर संचेती, अमोल पारेख यांना घटना कळविली.
पोलिसांना माहिती दिली असता पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे जवळच रात्रगस्त घालत होते. त्यामुळे पोलीस पथक तातडीने घटनास्थळी आले. पोलिसांची चाहूल लागताच पाच दरोडेखोर ऐवज घेऊन शेजारच्या इमारतीच्या गच्चीवर गेले. तर दोन चोरटे आलेल्या मार्गाने पळून गेले. बाजारपेठेतील नागरिक, काजीपुरा येथील तरुण तसेच परिसरातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने मदतीसाठी येऊन परिसराला वेढा घातला. गिरीशशेठ समदडिया यांच्या इमारतीच्या गच्चीवर लपलेल्या पाच दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडे कोयता, कटावणी, गॅस कटर, गॅस गन व एक बनावट पिस्तूल मिळाले आहे.
वैभव बाळू रोकडे (वय 24 रा. नागाचा खडक मुरबाड), गणेश रामचंद्र टोके(वय 26 रा. नडे ता. मुरबाड), अजय सखाराम भिसे ( वय20 रा. कलगाव ता. शहापूर) ग्यानसिंग भोला वर्मा (वय 23 रा. घोडबंदर रोड ठाणे) व मोहम्मद अरमान दर्जी (वय 23 रा. नेहरूनगर कुर्ला) यांना पोलिसांनी मुद्देमालासह पकडले आहे. इतर दोघे फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी सकाळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस पथकाच्या या कामगिरीबद्दल त्यांनी अभिनंदन केले आहे. पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे, पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे, पोलीस कर्मचारी तानाजी हगवणे, नंदकुमार आढारी, होमगार्ड फैजल खान, अर्जुन ठोंबरे यांनी ही कामगिरी केली आहे. यश व जैना समदडिया यांच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे. यश याच्या हाताला करकचून बांधल्याने दुखापत झाली आहे.चोरटे सव्वा तास समदडिया यांच्या घरात ठाण मांडून होते.स्थानिक नागरिकांनी दाखवलेली तत्परता याबद्दल पोलिसांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत.