पिंपरी : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने शारीरिकदृष्ट्या अपंग (दिव्यांग) असलेल्या ३११ मतदारांसाठी सहाही विधानसभा कार्यक्षेत्रात गृहमतदान प्रक्रिया राबविण्यात आली असल्याची माहिती मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.
मावळ लोकसभा मतदारसंघांतर्गत असलेल्या सहाही विधानसभा कार्यक्षेत्रात भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या मार्गदर्शनाखाली गृहमतदान प्रक्रिया होत आहे. याकरिता बूथस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी सर्वेक्षण करून इच्छुक मतदारांकडून १२ ड अर्ज भरण्यात आले होते. या अर्जांची छाननी करून दिव्यांगांसह ८५ वर्षे वयावरील पात्र मतदारांसाठी टपाली मतपत्रिका तयार करण्यात आल्या होत्या. त्यानंतर गृहमतदान प्रक्रिया राबविण्यासाठी या मतदारांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन टपाली गृहमतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यात आली.
स्वतंत्र पथकांची नियुक्ती...
गृहमतदानासाठी स्वतंत्र्य पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये सेक्टर ऑफिसर, पर्यवेक्षक, केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलिस अधिकारी, कर्मचारी, सूक्ष्म निरीक्षक, बीएलओ, व्हिडीओग्राफर यांचा समावेश होता. या गृहमतदानासाठी वेळापत्रक तयार करण्यात आले होते. गृहमतदानाबाबतची पूर्वकल्पना संबंधित मतदार यांना लेखी स्वरूपात देण्यात आली होती. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे गृहमतदान प्रक्रियेवेळी काटेकोरपणे पालन करून पनवेल व पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये प्रक्रिया पार पडली.
पनवेलमध्ये ५६, तर पिंपरीमध्ये ३४...
पनवेल विधानसभा कार्यक्षेत्रात शारीरिकदृष्ट्या अपंग (दिव्यांग) असलेले १६ मतदार आणि ८५ वर्षे वयावरील ४१ मतदार अशा एकूण ५७ मतदारांनी गृहमतदान केले. तसेच पिंपरी विधानसभा मतदारसंघात ३४ जणांनी गृहमतदान केले. मावळ लोकसभा मतदारसंघातील उर्वरित विधानसभा मतदारसंघात अशा प्रकारे गृहमतदान प्रक्रिया नियोजित वेळापत्रकानुसार पार पाडली जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी यावेळी सांगितले.