पुणे : पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या समर्थकांना NIA या केंद्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ पुण्यात काल PFI संघटनेच्या समर्थकांनी आंदोलन केले. मोठ्या संख्येने आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमा झाले होते. यावेळी काही आंदोलकांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. यावरून आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. पोलिसांनी मात्र अशा घोषणा दिल्या गेल्या नाहीत असं म्हटलं आहे. मात्र व्हायरल झालेल्या काही व्हिडिओमध्ये पाकिस्तान जिंदाबाद या घोषणा ऐकायला मिळत आहेत.
PFI संघटनेच्या राज्यस्तरीय नेत्यांना NIA, ED या केंद्रीय तपास यंत्रणेने अटक केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या 60 ते 70 जणांवर पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी हे आंदोलन करण्यात आले होते. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी PFI संघटनेच्या समर्थकांनी 'पाकिस्तान जिंदाबाद' घोषणा दिल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या घोषणाबाजीबद्दल पोलिसांनी कोणताही दुजोरा दिला नाही.
रिजाज जैनुद्दीन सय्यद (वय 26, शिवनेरी नगर कोंढवा खुर्द) याच्यासह 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवी 141 143 145 147 149 188 341 सह मपोका 37/1/3 सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार नवनाथ डांगे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेकायदेशीर जमा जमा करून आंदोलन केले. NIA, ED या केंद्रीय तपास यंत्रणेने पीएसआय च्या राज्यस्तरीय नेत्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आरोपींनी मोठमोठ्याने घोषणा देत रस्ता अडवला. येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना व वाहनांना अडथळा निर्माण करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. बंड गार्डन पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.