पिंपरी : पिंपळे- सौदागर येथील साई ड्रीम्स सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरील सदनिकेला रविवारी सायंकाळी आग लागली. त्यावेळी सहाव्या मजल्यावर धुरात अडकलेल्या दोन वर्षाच्या चिमुरडीसह अन्य नागरिकांना बाहेर काढण्यात अग्निशामक दलाच्या पथकास यश आले. तर दोन बंबांच्या साहाय्याने आग विझविण्यात आली.
अग्निशामक दलाच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील गोविंद गार्डनजवळ साई ड्रीम्स ही सोसायटी आहे. त्यातील चौथ्या मजल्यावरील सदनिकेला रविवारी सायंकाळी साडेतीन वाजता आग लागल्याची माहिती निशांत फलके यांनी अग्निशामक दलास दिली. त्यानंतर पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्र, रहाटणी थेरगाव उप अग्निशमन केंद्राचे पथक घटनास्थळी आले.
त्यावेळी चौथ्या मजल्यावरील फ्लॅटला आग लागल्याचे निदर्शनात आले. आगीमध्ये हॉलमधील साहित्य, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, किचनमधील गृहपयोगी साहित्य इत्यादींने पेट घेतला होता. याठिकाणी आग आणि धुर एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता. त्याठिकाणी सुरुवातीला काही जवानांनी आग नियंत्रणात आणण्याचे काम केले.
आगीवर नियंत्रण मिळवताना वरील मजल्यावर धुरामध्ये काही लोक अडकल्याची माहिती मिळाली. त्या व्यक्तींची सुटका करण्यासाठी पथक सहाव्या मजल्यावर गेले. तेथील सदनिका बंद होती. आणि धुरही मोठा होता. त्यावेळी चार्वी घवाणे ही दोन वर्षांची चिमुरडी आणि सोबत दिव्यांग वयोवृद्ध आजी आजोबा असल्याची माहिती मिळाली. प्रसंगावधान राखून जवान विकास कुटे यांनी दरवाजे तोडले. त्यावेळी मोठाप्रमाणार धूर झाला होता. त्यावेळी तिला आणि आजी आजोबांना धुरातून सुखरूपपणे बाहेर काढले.
सर्वांना मोकळ्या जागेत हलविण्यात आले. आगीवर २ गाड्या पाणी मारून आग विझविण्यात आली. या घटनेत वित्तहानी झाली असली तरी कोणतीही जीवित हानी झाली नाही. या पथकात विजय घुगे, विकास नाईक, विकास तोरडमल, अनिल वाघ, अमोल चिपळूणकर यांच्या पथकाने मदत कार्य केले.