पिंपरी : महापालिका निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. त्यामुळे शिवसेनेतील दोन्ही गटांनी शक्तिप्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शहरातील गटाने स्वतंत्र शिवसेना भवन उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आकुर्डीत भवन, तर बाळासाहेबांची शिवसेना गटाचे चिंचवडगावात तात्पुरते भवन उभारले जाणार आहे. तर एमआयडीसीकडे शहरात जागा उपलब्ध करावी, अशी मागणी केली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील राजकारण तापले आहे. शिवसेनेत उभी फूट पडली. चाळीस आमदार, १२ खासदार यांनी स्वतंत्र गट केला आणि शिवसेना आमचीच, असा दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत अनेक आमदार आणि खासदार गेले. त्यात मावळमधील खासदार श्रीरंग बारणे आणि शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिंदे गटात गेले आहेत. त्यांच्याबरोबर आजी-माजी समर्थक गेले आहे. शिंदे गटाला दोन खासदारांची ताकद मिळाली आहे; तर महापालिकेच्या राजकारणातही शिंदे गट लक्ष घालत आहे.
उद्धव ठाकरे गटाचे आकुर्डीत भवन
शिवसेनेत गटबाजी सुरू झाली असली, तरी मागील पंचवार्षिकमधील शिवसेनेच्या नऊ नगरसेवकांपैकी एकजण भाजपात गेले आहेत, तर एकाने जाहीरपणे खासदार बारणे यांच्याबरोबर असल्याचे जाहीर केले आहे. उर्वरित सात माजी नगरसेवकांनी भूमिका घेतलेली नाही. आकुर्डीतील खंडोबामाळ चौकात शिवसेना भवन आहे. अन्य शहरात शिवसेना भवन कोणाचे, यावरून वाद सुरू झाला आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये शिंदे गट स्वतंत्र शिवसेना भवन बांधण्याच्या तयारीत आहे.
चिंचवडगावात तात्पुरते कार्यालय
शहरात शिंदे गटाच्यावतीने चिंचवडगावातून वाल्हेकरवाडीत जाणाऱ्या जकात नाका येथे तात्पुरते कार्यालय उभारले जाणार आहे. तसेच शहरातील तीन महापालिका आणि एमआयडीसी अशा वेगवेगळ्या विभागातील जागांची पाहणी केली आहे. तसेच महापालिका आणि एमआयडीसीकडे जागांची मागणी केली आहे. चिंचवड स्टेशन पोलीस वसाहतीजवळचा एमआयडीसीचा एक मोकळा भूखंड मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
शिवसेनेचे तात्पुरते संपर्क कार्यालय चिंचवड जकात नाक्याजवळ सुरू केले जाणार आहे, तर शहरातील विविध भागातील दोन ते तीन जागांची पाहणी केली आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. जागा उपलब्ध झाल्यास स्वतंत्रपणे भवन उभारण्यात येणार आहे.
- बाळासाहेब वाल्हेकर, जिल्हाप्रमुख, बाळासाहेबांची शिवसेना