पिंपरी : माझ्या घरी पोर घेऊन का गेला, असे म्हणत सात जणांनी मिळून एकाला मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना पिंपरीतील बौद्धनगर येथे सोमवारी (दि.१) घडली.
ऋषिकेश सचिन जमदाडे (वय १९, रा. बौद्धनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. ४) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सिद्धार्थ वाघमारे (नानेकर चाळ, पिंपरी), आशिष पाल (पिंपरी गाव), रितेश किर्ते व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी आणि फिर्यादीचे मित्र अक्षय केशव आम्ले, अविनाश माने हे आरोपी रितेश किर्ते याच्या घरी गेले. तुमच्या मुलाला समजून सांगा, असे त्यांनी किर्ते याच्या आईला सांगितले. त्यानंतर फिर्यादी हे दगडू साबळे शाळेच्या कट्ट्यावर बसलेले असताना आरोपी किर्ते आणि त्याचे दोन साथीदार तेथे आले. त्याचवेळी दोन दुचाकीवरून चार जण तेथे आले. या सर्वांनी मिळून फिर्यादींना शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपी किर्ते याने तू माझ्या घरी मुले घेऊन का गेला होतास, असे म्हणत लोखंडी कोयता उलट्या बाजूने फिर्यादीच्या डोक्यात आणि हातावर मारून फिर्यादीला जखमी केले.
याच्या परस्परविरोधी तक्रार रितेश प्रभाकर किर्ते यांनी केली आहे. त्यानुसार, ऋषिकेश जमदाडे, अविनाश प्रकाश माने आणि अक्षय केशव आम्ले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी मिरवणुकीत नाचताना झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणाहून आरोपींकडून फिर्यादींना मारहाण करण्यात आली होती. हे कळल्यानंतर फिर्यादींनी दगडू साबळे शाळेजवळ जाऊन आरोपींना तू माझ्या घरी का गेला होतास, अशी विचारणा केली. त्यावेळी आरोपी जमदाडे याने लोखंडी कोयत्याच्या मुठीने फिर्यादींना मारले, तसेच इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारत फिर्यादींना जखमी केले, तसेच त्यांच्या दुचाकीचे नुकसान केले.