लोणी काळभोर: परप्रांतीय उद्योजक महिलेला शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करून त्याचा दुप्पट परतावा करून देतो असे अमिष दाखवून तब्बल एक कोटींची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आर्थिक फसवणुक करणा-या दोघांविरुध्द लोणी काळभोर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी ममता सिंह मलिक (वय ३८, सध्या रा. अमरवस्ती, कोरेगावमुळ, ऊरूळी कांचन, ता. हवेली. मुळगाव अमरोहा, जि. मुरादाबाद, उत्तर प्रदेश) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रवि कानकाटे ऊर्फ रविंद्र मुरलीधर भोसले ऊर्फ जगीश मुरलीधर भोसले व स्वप्नील कानकाटे (दोघे रा. इनामदार वस्ती, गुरुदत्त नर्सरीशेजारी कोरेगाव ता. हवेली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता सिंह मलिक यांनी मार्च २०२१ पासुन प्युरिस्टीक न्युट्रीशियन नावाने बोधे काकडे वस्ती, प्रयागधाम, कोरेगावमुळ रोड, ऊरूळी कांचन येथे सेंद्रिय उत्पादन व विक्रीचा व्यवसाय चालू केला आहे. त्यांच्या ओळखीचे राजेंद्र खेडेकर (रा. इनामदारवस्ती, उरूळी कांचन) यांच्या पंचकृषी नर्सरी, इनामदार वस्ती पुणे सोलापुर रोड ठिकाणी ममता सिंग यांनी ऑफिस सुरु केले होते. त्याठिकाणी काम करत असताना रवि व स्वप्नील कानकाटे यांनी आयुर्वेदिक न्यूट्रीशियन बाबत चौकशी करून काही उत्पादने खरेदी करुन घेऊन गेले होते. त्यानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये येणे जाणे सुरु झाले होते. त्यादरम्यान त्यांनी शेअर्समध्ये गुंतवणुक करण्याबाबतचा सल्ला दिला व गुंतवणुक केलेल्या रक्कमेच्या डबल रक्कम मिळेल असे सांगितले. त्यावेळी स्वप्नील याने रवि हा माझा भाऊ असून त्यास तुम्ही पैसे दया त्याची जबाबदारी मी घेतो. अशा प्रकारे त्यांनी दोघांनी विश्वास संपादन केला.
त्यावेळी ममता सिंग यांनी त्यांच्यावर विश्वास ठेऊन रवि कानकाटे याच्या बॅक खात्यामध्ये वेळोवेळी २५ जुलै ते १ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत धनादेश, ऑनलाईन ट्रान्सफर, गुगलपे, एनईएफटी, आरटीजीएसव्दारे बॅक खात्यावर व रोख स्वरुपात असे एकूण १ कोटी रुपये दिले होते. सुरूवातीला एक महिन्यानंतर रवी कानकाटे याने त्यांना काही रक्कम परतावा म्हणून दिली होती. त्यानंतर त्यांचे गुंतवणुकीवरील परतावा म्हणुन दोन कोटी पन्नास लाख रूपयाचा एचडीएफसी बॅकेचा रवि भोसले या नावाचा धनादेश दिला. तो बँकेत भरला परंतू ते खाते बंद असल्याचे त्यांना बॅकेकडुन समजले. तेव्हा त्यांची आर्थिक फसवणुक झालेची खात्री झाली. म्हणून त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. स्वप्नील कानकाटे व रवि कानकाटे या दोघांवर यापुर्वी गुन्हे दाखल नसले तरी त्यांनी अनेक जणांना फसवले असल्याची चर्चा या परिसरात होते आहे.