लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतविण्यास दिलेल्या ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटींची खंडणी मागून व्यावसायिकाचे अपहरण करुन त्याला धमकाविल्याच्या प्रकरणात मोक्का कारवाई केलेल्या कुख्यात गुंड गज्या मारणे टोळीतील आणखी एका गुंडाला दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने जेरबंद केले आहे.
मयुर राजेंद्र निवंगुणे (वय२४,रा. वसंत प्लाझा, नर्हे) असे या गुंडाचे नाव आहे. या गुन्ह्यातील अटक झालेला हा ६ वा आरोपी आहे. कुख्यात गुंड गज्या मारणे टोळीने एका व्यावसायिकाचे ७ ऑक्टोबर रोजी कात्रज येथून अपहरण केले होते. या व्यावसायिकाचे अपहरण केल्यानंतर गज्या मारणे याने दुसर्याच्या फोनवरुन मी महाराज बोलतोय, तुमचा जो काय विषय असेल तो मिटवून घ्या, नाही तर तुला संपवून टाकीन, अशी धमकी कुख्यात गुंड गज्या मारणे याने दिल्याने त्याच्यासह पप्पु घोलप, अमर किर्दत, रुपेश मारणे, सांगलीचा हेमंत पाटील अशा १४ जणांवर गुन्हा दाखल केला. त्यातील चौघांना अटक केली आहे.चंदगडचा डॉ.प्रकाश बांदिवडेकर याचा सहभाग आढळल्याने त्याला इंदूरहून अटक केली.
गुन्हे शाखेची विविध पथके याआरोपींचा शोध घेत असताना दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे यांना मयुर निवंगुणे हा नवले ब्रीज येथे येणार असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील,सहायक फौजदार शाहीद शेख, हवालदार निलेश शिवतरे, पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे, श्रीकांत दगडे, ऋषिकेश कोळप, तेजाराणी डोंगरे या पथकाने सापळा रचून त्याला पकडले. सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या ताब्यात त्याला दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"