पुणे : शहरातील चौकाचौकांत दहीहंडी साजरी करणाऱ्या काही मंडळांनी ‘लेझर शो’चे आयोजन करून पोलिसांचा आदेश मंगळवारी (दि. २७) धुडकावून लावला. त्यामुळे दहीहंडी उत्सवात सहभागी झालेल्यांना डोळे दीपवणाऱ्या लेझर किरणांचा त्रास सहन करावा लागला.
गतवर्षी विसर्जन मिरवणुकीत गेल्या वर्षी लेझर दिव्यांमुळे अनेकांच्या डोळ्यांना इजा झाली होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सार्वजनिक मंडळांच्या घेतलेल्या बैठकीत यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत लेझर दिवे वापरास बंदी घालण्यात येणार आहे, असे सूचित केले होते. त्यानंतर सह-पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी लेझर दिव्यांवर पुढील साठ दिवस बंदी कायम राहणार असल्याचे परिपत्रक शनिवारी काढले. मात्र सह-पोलिस आयुक्तांनी दिलेला आदेश धुडकावून मध्यभाग, तसेच उपनगरांतील विविध मंडळांनी दहीहंडीसाठी लेझर दिवे बसविले. लेझर दिवे बसविण्यासाठी मोठे लोखंडी सांगाडे उभे करण्यात आल्याने वाहतुकीस उपलब्ध असलेला रस्ताही बंद झाला. ध्वनिवर्धकांच्या भिंती उभ्या करण्यात आल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांची मोठी गैरसोय झाल्याचे पाहायला मिळाले.
पोलिसांचा कारवाईचा इशारा
ज्या मंडळांकडून ध्वनिमर्यादेचे उल्लंघन झाले आहे आणि लेझर प्रकाशझोतांचा वापर करण्यात आला आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. यासाठी शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांना व्हिडीओ चित्रीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चित्रीकरण पाहून पुढील कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिला आहे.