पुण्यात CNG आणखी महागला, सरकारच्या व्हॅट कपातीचा आनंद विरघळला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 09:36 AM2022-04-29T09:36:33+5:302022-04-29T09:41:24+5:30
राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी व्हॅट कमी केल्याने सीएनजीच्या किंमती 5 ते 6 रुपयांनी कमी झाल्या होत्या
पुणे - राज्यात पेट्रोल दरकपातीवरुन चांगलंच राजकारण पेटलं असताना आता पुण्यात सीएनजी गॅसच्या किंमतीत 2.20 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे, पुण्यात कॉम्प्रेसड नॅचरल गॅस म्हणजेच 'सीएनजी'चा प्रति किलो 77.20 रुपयांना खरेदी करावा लागणार आहे. ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स संघटनेचे अध्यक्ष अली दारुवाला यांनी याबाबतची माहिती दिली. सध्या, इंधन दरकपातीवरुन महाराष्ट्र सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा वाद रंगला आहे. त्यातच, ही दरवाढ झाल्याने राज्य सरकारची आणखी डोकेदुखी वाढणार आहे.
राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी व्हॅट कमी केल्याने सीएनजीच्या किंमती 5 ते 6 रुपयांनी कमी झाल्या होत्या. मात्र, लोकांना याचा फायदा जास्त काळ घेता येईल, असे दिसत नाही. कारण, गेल्या दीड महिन्यात ही तिसऱ्यांदाच सीएनजीच्या दारत वाढ करण्यात आली आहे. सीएनजी नवी 2.20 रुपये प्रतिकिलोची दरवाढ आजपासून लागू करण्यात आली आहे. त्यामुळे, आता पुण्यात सीएनजी 77.20 रुपये प्रति किलोने द्यावी लागणार आहे. यापूर्वीही सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे दोन रुपयांची वाढ करण्यात आली होती. तेव्हा सीएनजीचे दर 73 रुपयांवरून 75 रुपयांवर पोहोचले होते. तर, त्यापूर्वी सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे पाच रुपयांची वाढ करण्यात आल्याने सीएनजीचे दर 68 रुपयांवरून थेट 73 रुपयांवर पोहोचले होते.
Maharashtra | Compressed Natural Gas (CNG) price in Pune city increased by Rs 2.20. It will cost Rs 77.20 per kg from today: Ali Daruwala, Spokesperson, All India Petrol Dealers Association
— ANI (@ANI) April 29, 2022
राज्याने व्हॅट कमी केला, पण दर जैसे थेच
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोविडसंदर्भातील बैठकीत बोलताना राज्य सरकारला पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचे सूचवले होते. त्यावरुन, राज्य विरुद्ध केंद्र असा सामना पाहायला मिळाला. त्यावेळी, अर्थमंत्री अजित पवार यांनी सीएनजी दरात कपात केल्याची आठवण करुन दिली होती. राज्यात 1 एप्रिलपासून सीएनजीच्या व्हॅटमध्ये साडेतेरा टक्क्यांची कपात करण्यात आल्याने सीएनजी गॅस प्रति किलोमागे सहा रुपयांनी स्वस्त झाला होता. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण, महिनाभराच्या आतच हे दर जैसे थे झाल्याचं दिसून येत आहे.
पुण्यातील आजचे इंधन दर
पेट्रोल - 119.96
पॉवर पेट्रोल - 124.46
डिझेल - 102.37
सीएनजी - 77.20