पुणे :पुणे शहर आणि जिल्ह्यात डाेळ्यांची साथ ओसरायला लागली आहे. नवीन रुग्णांच्या तुलनेत आता बरे झालेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे, लवकरच ही साथ आटाेक्यात येईल अशी चिन्हे आहेत. आतापर्यंत शहरात १३ हजार रुग्ण आढळले असून त्यापैकी १० हजार जण बरे झाले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये साडेआठ हजार रुग्ण सापडले असून ७ हजार ८०० हून अधिक बरे झाले आहेत. तर पुणे ग्रामीणमध्ये ४८ हजार रुग्ण आढळले असून त्यापैकी ३३ हजार रुग्ण बरे झाले आहेत.
जुलैपासून पुणे ग्रामीणमधील आळंदी येथून खरे डाेळे येण्याच्या साथीला सुरुवात झाली. संसर्गजन्य असल्याने ही साथ झपाट्याने दाेन्ही शहरात पसरली. मात्र, गेल्या आठवड्याच्या तुलनेत रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. सध्या औंध-बाणेर आणि नगर रस्ता-वडगावशेरी या भागांमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत.
वातावरणातील बदल, अॅडिनो आणि एंटेरो विषाणूमुळे डोळ्यांचा संसर्ग होतो. मात्र, संसर्ग सौम्य स्वरूपाचा असल्याने त्याचा फार त्रास हाेत नाही. त्यामुळे पाच ते सहा दिवस रुग्णाला डोळे लाल होणे, सूज येणे, पापण्या चिकटणे, पाणी येणे अशी लक्षणे दिसतात. पाच-सहा दिवसांनी रुग्ण बरा होतो. काही बाबतीत डाेके दुखणे, डाेळे सुजणे अशीही लक्षणे दिसतात.
सुरुवातीला पुणे जिल्ह्यात आळंदी आणि खेड परिसरात रुग्ण आढळले होते. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात प्रादुर्भाव वाढला. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली. तसेच शासनाकडून दैनंदिन आकडेवारीही अपडेट केली जाऊ लागली. तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये विशेष ओपीडी सुरु करण्यात आली. आता, नवीन रुग्णांची संख्या कमी असल्याची माहीती साथराेग अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.
या आहेत उपाययोजना -
- शासकीय आणि खासगी शाळांमध्ये सर्वेक्षण
- महापालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये तपासणी आणि उपचार
- खासगी रुग्णालयांना रुग्णांबाबत मार्गदर्शन, सूचना
- औषधांचा मुबलक साठा उपलब्ध
जिल्ह्यातील डाेळे आलेल्या रुग्णांची आकडेवारी :
ठिकाण आढळलेले रुग्ण - बरे झालेले - उपचाराधीन
पुणे शहर - १३,६२९ - १०,९४६ - २,०६७
पिंपरी चिंचवड - ८४४२ - ७,८५७ - २९४
पुणे ग्रामीण - ४७,९४३ - ३३,३९६ - १६,२८९
एकूण - ७०,०१४ - ५२,१९९ - १८,६५०
शहरामध्ये आतापर्यंत २६९ शाळांमध्ये ६४ हजार ८७३ मुलांची तपासणी केली. यामध्ये २०६७ विद्यार्थ्यांना डोळ्यांचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले. शाळेत मुलांना डोळ्यांशी संबंधित कोणताही त्रास आढळून आल्यास ताबडतोब घरी पाठवावे, पालकांनी मुलांना डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार द्यावेत आणि पूर्ण बरे वाटेपर्यंत शाळेत पाठवू नये.
- डाॅ. सूर्यकांत देवकर, सहायक आराेग्य अधिकारी, पुणे मनपा.