पुणे : पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख ६५ हजार शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले आहे. या कार्डाचे दरवर्षी नूतनीकरण केले जाते. गेल्या वर्षी ४.१० लाख कार्डांचे वाटप केले होते. यंदाही हा आकडा तेवढाच असेल, अशी माहिती अग्रणी बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक श्रीकांत कोरगावकर यांनी दिली. हे कार्ड बँकेच्या बचत खात्यासारखे असून, शेतकऱ्यांना गरजेनुसार त्याचा वापर करता येतो. वेळेत परतफेड केल्यास व्याजाचा १०० टक्के परतावा मिळतो, असेही त्यांनी सांगितले.
- पीएम किसान सन्मान योजनेचे जिल्ह्यात ५ लाख ३७ हजार लाभार्थी आहेत.
- जिल्ह्यात २.६५ हजार शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड
आकडा आणखी वाढेल
सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात आतापर्यंत २.६५ हजार शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड मिळाले आहे. हे कार्ड एका वर्षासाठी दिले जाते. याची प्रक्रिया वर्षभर सुरू असल्याने वर्ष सरल्यानंतर पुन्हा त्याचे नुतनीकरण केले जाते. त्यामुळे या आर्थिक वर्षाखेर हा आकडा आणखी वाढेल, अशी माहिती कारेगावकर यांनी दिली.
क्रेडिट कार्डचा लाभ काय?
तुम्ही क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी तुमच्याकडील जमीन, तिचा प्रकार, घेतली जाणारी पिके याचा तपशील बँकेला द्यावा लागतो. त्यानुसार तुमची क्रेडिट कार्डाची मर्यादा निश्चित केली जाते. ही रक्कम तुम्हाला अन्य क्रेडिट कार्डांसारखी वापरता येते. त्याचा उपयोग खते, बी-बियाणे, कीटकनाशके, औजारे खरेदीसाठी करता येतो. आपत्कालीन परीस्थितीत त्यातून रोख पैसेही काढता येतात. मात्र, या रकमेचा भरणा एक वर्षाच्या आत करावा लागतो. हा भरणा ३६४ दिवसांच्या आत अर्थात वर्षाच्या एक दिवस आधी केल्यास संबंधित शेतकरी व्याज परताव्याला पात्र ठरतो, असेही कारेगावकर यांनी सांगितले.
बँकेकडे करा अर्ज
कोणताही शेतकरी या कार्डासाठी अर्ज करू शकतो.
काय कागदपत्रे लागतील?
क्रेडिट कार्डासाठी ७-१२ उतारा, ८ अ उतारा तसेच पहिल्यांदा कार्ड घेत असल्यास फेरफार नकला ही कागदपत्रे आवश्यक असतात. नूतनीकरणावेळी फेरफार नकलांची आवश्यकता नसते. तसेच केवायसीसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान ओखळपत्र द्यावे लागते.
गेल्या तीन दिवसांपूर्वीच जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. खासगी सावकार व पतसंस्थेकडून त्यांनी कर्ज घेतले होते. ही वेळ येऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी सरकारी बँकाच्या क्रेडिट कार्डाचा लाभ घ्यावा. हे बचत खात्यासारखे आहे. गरजेच्या वेळी या पैशांचा वापर करता येतो. एका वर्षाचा आत कर्ज फेडल्यास १०० टक्के व्याज परतावा मिळतो.
- श्रीकांत कारेगावकर, वरिष्ठ व्यवस्थापक, अग्रणी बँक, महाराष्ट्र बँक