पुणे : शाळा सुरू झाल्याने आणि कोरोनाच्या चौथ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणावर भर दिला जात आहे. सध्या जिल्ह्यात २३ लाख ६ हजार ५६५ जणांचा पहिला; तर ११ लाख ३२ हजार ३४१ मुलांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे, अशी माहिती आराेग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
संभाव्य धाेका विचारात घेऊन पालकांनी प्राधान्याने मुलांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. तसेच शुक्रवार (२४ जून) पासून शाळांमध्येही लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे.
जिल्ह्यात १२ ते १४ वर्षे वयोगटातील ५४ टक्के मुलांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. पहिल्या डोसचे सर्वाधिक ८६ टक्के प्रमाण नाशिकमध्ये आहे. सर्वात कमी ३२ टक्के प्रमाण मुंबईत आहे. पुणे जिल्ह्यात २८ टक्के मुलांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. दुसऱ्या डोसचे सर्वाधिक प्रमाण नाशिकमध्ये, तर सर्वात कमी प्रमाण नांदेड जिल्ह्यात आहे.
इतर वयोगटामधील लसीकरणाची स्थिती :
पुणे जिल्ह्यात १८ वर्षांपुढील १३ लाख २२ हजार ३९० जणांनी कोव्हिशिल्डचा दुसरा डोस अद्याप घेतलेला नाही. ही संख्या राज्यात सर्वाधिक आहे. जिल्ह्यात कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस अद्याप २ लाख २९ हजार ७१० जणांनी घेतलेला नाही.