पुणे जिल्ह्यातील 'या' तालुक्याचं नामंतर राजगड करावं; अजित पवारांचं सरकारला पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 06:17 PM2023-04-27T18:17:19+5:302023-04-27T18:18:11+5:30
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहिले आहे.
मुंबई - महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी तब्बल २७ वर्षे स्वराज्याचा कारभार राजगडावरुन चालवला. किल्ले राजगड हा स्वराज्याची पहिली राजधानी, स्वराज्य स्थापनेतील अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. राजगडाचं ऐतिहासिक महत्वं, वेल्हे आणि महाराष्ट्रवासियांच्या मनातलं राजगडाबद्दलचं आदराचं स्थान लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नामांतर 'राजगड' करण्यात यावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमख्यमंत्र्यांकडे केली आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहिले आहे. त्यात वेल्हे तालुक्याचे नामांतर राजगड करण्यात यावे, अशी आग्रही मागणी केली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या २२ नोव्हेबर २०२१ रोजीच्या सर्वसाधारण सभेत वेल्हे तालुक्याचे नामांतर राजगड करण्याबाबत सकारात्मक ठराव झाला आहे. त्यावेळी वेल्हे तालुक्यातील ७० पैकी ५८ ग्रामपंचायतींनी, तालुक्याचे नामांतर राजगड करण्याचे ठराव सादर केले होते. किल्ले राजगडाबद्दल वेल्हे तालुकावासियांच्या, तमाम महाराष्ट्रवासियांच्या मनात असलेली आदर, अभिमानाची भावना लक्षात घेऊन वेल्हे तालुक्याचे नामांतर तातडीने करण्यात यावे अशी मागणी पत्रातून अजित पवारांनी केली आहे.
तसेच पुणे जिल्हयातील वेल्हे तालुक्याचे नामांतरण राजगड तालुका करणेबाबत लोकभावना तीव्र आहेत. याबाबत वेल्हे तालुक्यामध्ये स्थित असलेल्या राजगड या किल्ल्याशी तालुक्यामधील सर्व नागरिकांचे जिव्हाळयाचे संबध आहेत. सदर किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रथम राजधानी असलेने सदर ठिकाणावरुन छत्रपती शिवाजी महाराज यांनी २७ वर्षे शासन चालविले. वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड असे करण्यात यावे, अशी वेल्हे तालुक्यातील नागरिकांची तीव्र इच्छा आहे असं अजित पवारांनी म्हटलंय.
पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नामांतरण राजगड तालुका असं करावं, त्यासंदर्भातील प्रस्तावास मान्यता देण्यात यावी, अशी मागणी पत्रामार्फत मुख्यमंत्री @mieknathshinde जी, उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी आणि महसूल मंत्री @RVikhePatil जी यांच्याकडे केली आहे. pic.twitter.com/66r98fxtWu
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 27, 2023
दरम्यान, वेल्हे तालुक्यात शिवकालीन व ऐतिहासिक वारसा असलेला राजगड व किल्ले तोरणा असे दोन महत्वपूर्ण किल्ले समाविष्ट आहेत. या तालुक्याचे जुने दस्त पाहता किल्ले तोरणाचे नाव प्रचंडगड या नावाने तालुक्याची ओळख होती. सदर तालुक्याचे मुख्य ठिकाण हे वेल्हे बु. घेरा या ठिकाणी असलेने तालुक्याचे नाव वेल्हे असे नमूद आहे. वेल्हे तालुक्यातील नागरिकांच्या भावना या राजगड किल्ल्याशी जोडलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी या तालुक्यामध्ये स्थित असल्याने किल्ले राजगड वरुन या तालुक्याचे नामकरण ''राजगड'' करणेबाबतच्या प्रस्तावास मान्यता देण्यात यावी असं अजित पवार यांनी राज्य शासनाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.